‘मोदी देवाची देणगी’वरून रा. स्व. संघ नाराज
By admin | Published: March 24, 2016 01:59 AM2016-03-24T01:59:47+5:302016-03-24T01:59:47+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘भारताला मिळालेली देवाची देणगी’ आहे, या भाजपा नेत्याने नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘भारताला मिळालेली देवाची देणगी’ आहे, या भाजपा नेत्याने नुकत्याच पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
राजस्थानच्या नागौर येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिनिधी सभेत भाजपा नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर संघाच्या नेत्यांनी मंगळवारी पुन्हा नवी दिल्लीतील दीनदयाल शोध संस्थानमध्ये भाजपा नेत्यांशी चर्चा केली. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील कार्यवाहीची माहिती संघ नेत्यांना देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
संघातर्फे सुरेश ऊर्फ भय्याजी जोशी, कृष्ण गोपाल आणि दत्तात्रय होसबळ, तर भाजपातर्फे अध्यक्ष अमित शाह, सरचिटणीस रामलाल आणि उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे हे या बैठकीला हजर होते. ‘मोदी हे देशाला मिळालेली देवाची देणगी आहेत’ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केले होते. संघाच्या नेत्यांनी नायडूंच्या या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि रा. स्व. संघामध्ये संघटन सर्वोच्च असल्याने ‘व्यक्तिपूजे’ला प्रोत्साहन देऊ नका, असा सल्ला भाजपा नेत्यांना दिला, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी राजकीय प्रस्ताव मांडताना नायडू यांनी, मोदी हे ‘भारताला मिळालेली देवाची देणगी’ आणि ‘गरिबांचा मसिहा’ असल्याचे तसेच मोदींमुळेच भारताला जगात मान्यता आहे आणि त्यांच्यामुळेच भारताला सर्वत्र पूजले जाते असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)