मांझींना तारण्यासाठी मोदींचा हात?
By admin | Published: February 9, 2015 12:21 AM2015-02-09T00:21:41+5:302015-02-09T00:21:41+5:30
संयुक्त जदच्या अंतर्गत संघर्षातून निर्माण झालेल्या वादानंतर मांझी यांनी पद सोडण्यास नकार दिला असतानाच मोदी यांची दिल्लीत घेतलेली भेट या राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला घटनात्मक पेच पाहता आयतीच पोळी भाजून घेण्याचा भाजपने प्रयत्न चालविला असून मांझी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीतून तसे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
संयुक्त जदच्या अंतर्गत संघर्षातून निर्माण झालेल्या वादानंतर मांझी यांनी पद सोडण्यास नकार दिला असतानाच मोदी यांची दिल्लीत घेतलेली भेट या राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते. अशा प्रकारचे वाद सोडविण्यासाठी विधानसभा हेच योग्य व्यासपीठ ठरू शकते, असे कायदेशीर तज्ज्ञांचे मत आहे. मांझीनी विधानसभा विसर्जित न करण्याचा पर्याय निवडला असून ११ दिवसानंतर म्हणजे २० फेब्रुवारी रोजी होणारे अधिवेशन सरकारचे भवितव्य ठरविणार आहे. मोदींनी मांझीला भेटीला वेळ देत त्यांना तारण्यासाठी डावपेच आखल्याचे संकेत दिले आहेत. कृषीमंत्री राधामोहनसिंग यांच्या निवासस्थानी बैठकीत भाजपच्या नेत्यांनी बिहारमधील परिस्थितीचा आढावा घेतला.