बजेटवर मोदींची छाप
By admin | Published: February 29, 2016 04:50 AM2016-02-29T04:50:25+5:302016-02-29T04:50:25+5:30
‘१२५ कोटी भारतीय उद्या माझी परीक्षा घेणार आहेत व या परीक्षेत मी नक्कीच यशस्वी होईन,’ असे ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासीयांना सांगून उद्या (सोमवारी) संसदेत सादर केल्या
हरीष गुप्ता, नवी दिल्ली
‘१२५ कोटी भारतीय उद्या माझी परीक्षा घेणार आहेत व या परीक्षेत मी नक्कीच यशस्वी होईन,’ असे ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासीयांना सांगून उद्या (सोमवारी) संसदेत सादर केल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली गडद छाप असेल, असे स्पष्ट संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिले. पंतप्रधानांचे राजकीय आणि आर्थिक अग्रक्रम अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होतच असतात व ते रास्तही आहे. पण अर्थसंकल्प ही व्यक्तिश: आपली परीक्षा असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत.
आता माझ्या सरकारला दोन वर्षे झाली आहेत व बराच अनुभव आता माझ्या गाठीशी आला असल्याने या वेळच्या माझ्या अर्थसंकल्पाकडे देशवासीयांनी जरा अधिक गांभीर्याने पाहावे, असेच मोदींनी यातून सूचित केले आहे. देशाच्या वित्तीय स्थितीचे सर्व बारकावे आता मोदींच्या पल्ल्यात आले आहेत व परिस्थितीवर त्यांची घट्ट पकड बसली आहे, हेही त्यांच्या विधानावरून स्पष्ट होते.
कर संकलन वाढविण्यासाठी आणि आगामी काळात वस्तू व सेवा कर प्रणाली लागू होण्याच्या अनुषंगाने सेवा कराच्या मूल्यात सध्याच्या १४.५ टक्क्यांवरून १६ टक्के अशी वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पाद्वारे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली करतील, अशी दाट शक्यता आहे. यामुळे स्वाभाविकच भाववाढ होईल अशी अपेक्षा आहे.
एकीकडे सेवा कराचा दर वाढविण्याचे संकेत मिळत असतानाच दुसरीकडे सध्या सेवा कराची मर्यादा वाढविण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे. सध्या १० लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यावसायिकाला सेवा कर माफ आहे. १० लाखांच्या पुढे सेवा कर भरावा लागतो. पण आता ही मर्यादा प्रति वर्ष २५ लाख रुपये होईल असे मानले जात आहे.
मोदींची परीक्षा
मोदी आणि जेटलींसमोर सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी, वन रँक वन पेन्शन आणि वसूल न होणाऱ्या कर्जाने त्रस्त झालेल्या बँका हे मोठे आव्हान उभे ठाकल्यामुळे साहजिकच कठोर उपाययोजनांचीही गरज आहे. बहुतेक यामुळेच मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये ‘उद्या माझीही परीक्षा आहे’ असा मुद्दाम उल्लेख केला असावा.
मोदींनी तत्पूर्वी अर्थमंत्रालयाकडून काही प्रस्ताव, योजनाही मागितल्या. अर्थात, विकासासाठी निधी उपलब्ध करण्याचे कठीण काम मोदींना करायचे आहे. त्याचबरोबर महागाई रोखणे आणि ग्रामीण भागातील आर्थिक ताणतणाव कमी करणे, अशी आव्हानेही त्यांच्यासमोर उभी आहेत.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी-२च्या (एनडीए-२) या अर्थसंकल्पाचा चांगला भाग असा की पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांच्यातील अतिशय उत्तम म्हणता येईल असे जुळलेले सूर. असे जुळलेले सूर पूर्वी एकदाच बघायला मिळाले होते ते म्हणजे पी.व्ही. नरसिंह राव आणि त्यांचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्यातील. अनेक सुधारणा राव व सिंग यांनी पाच वर्षांत केल्या; परंतु पूर्ण बहुमत असूनही मोदी व जेटली यांचा संघ गेल्या दोन वर्षांत संसदेतील कोंडीतच अडकून पडला आहे.