मोदींची नावीन्यपूर्ण मुत्सद्दीगिरी
By admin | Published: December 27, 2015 02:48 AM2015-12-27T02:48:09+5:302015-12-27T02:48:09+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी काबुलहून मायदेशी परतताना पाकिस्तानात लाहोर येथे उतरणार असल्याची आपल्यालाही कल्पना नव्हती. पंतप्रधानांनी स्वत: फोन केला तेव्हाच आपल्याला
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी काबुलहून मायदेशी परतताना पाकिस्तानात लाहोर येथे उतरणार असल्याची आपल्यालाही कल्पना नव्हती. पंतप्रधानांनी स्वत: फोन केला तेव्हाच आपल्याला हे समजले, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे सांगितले व मोदींची ही भेट म्हणजे ‘नावीन्यपूर्ण मुत्सद्दीगिरी’ असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना वाढदिवसाचे अभीष्टचिंतन करण्यासाठी मोदी यांनी अचानक लाहोरला जाण्याने सर्वच जण चकित झाले होते. रा. स्व. संघाच्या राज्य मुख्यालयात आयोजित ‘जन संवाद’मध्ये बोलताना याचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले की, भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व मी असे दोघे माझ्या सरकारी निवासस्थानाच्या हिरवळीवर बसलो होतो, तेव्हा पंतप्रधानांनी फोन करून आपण पाकिस्तानला जात असल्याचे सांगितले. मोदीजींच्या या निर्णयाने आम्हाला आश्चर्य वाटले.
गृहमंत्री म्हणाले की, ‘उभय देशांमध्ये राजनैतिक मुत्सद्दीगिरी सुरू असते व प्रत्येक देश हेच करीत असतो, पण मोदींनी लाहोरला जाऊन जे केले, ती नावीन्यपूर्ण मुत्सद्दीगिरी होती. संयुक्त राष्ट्र संघात गेले असता, सर्व सदस्य देशांना योगाचे महत्त्व पटवून देऊन, पंतप्रधानांनी जागतिक योग दिन जाहीर करून घेताना, जी सांस्कृतिक मुत्सद्दीगिरी दाखविली, तशीच ही मुत्सद्दीगिरी होती. नंतर पत्रकारांनी पाकिस्तानविषयीची ताठर भूमिका एकदम मवाळ कशी झाली, असे विचारले असता, राजनाथ सिंग म्हणाले, परराष्ट्र संबंधांतील राजनैतिक मुत्सद्दीगिरीत चढ-उतार हे होतच असतात. पाकिस्तानशी जेवढे जास्त बोलू, तेवढे देशासाठी चांगले असल्याने वाटाघाटींचा मार्ग बंद केला जाणार नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
अमेरिका, युनोकडून स्वागत
भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारल्याचा संपूर्ण प्रदेशाला लाभ होईल, असे सांगत, अमेरिका व संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सरप्राइज’ पाकिस्तान भेटीचे स्वागत केले आहे. मोदींच्या पाक भेटीचे आम्ही स्वागत करतो, असे अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले. युनोचे सरचिटणीस बान की मून यांनीही मोदी-नवाज शरीफ भेटीचे स्वागत केले आहे.
हे अगदी एखाद्या मुत्सद्याला साजेसे झाले. पडोसी से ऐसे ही रिश्ते होने चाहिये.- सुषमा स्वराज,
परराष्ट्रमंत्री (टिष्ट्वटरवर)