NSA अजित डोवालांनी आखला अॅक्शन प्लॅन, मोदींचा लेह दौरा होता सिक्रेट मिशन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 11:49 AM2020-07-04T11:49:07+5:302020-07-04T12:01:27+5:30
लेह येथील सीमारेषेवर जाऊन मोदींना भारतीय सैन्याच्या पराक्रमाचं कौतुक केलं.
नवी दिल्ली - विस्तारवादाचा काळ संपला आहे, हे लक्षात ठेवा,असा सज्जड इशारा भारतीय सीमेवरून चीनला देतानाच, आमच्या शत्रूंनी भारतीय सशस्त्रदलांची आग आणि संताप यांचा अनुभव घेतला आहे, असे म्हणत चीनला सुनावले. भारत व चीन यांच्यात लडाखमध्ये सीमेवरून तणाव असतानाच अचानक मोदी यांनी लडाखला भेट दिली. जवानांसमोर बोलताना मोदी यांनी गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री हुतात्मा झालेल्या २० भारतीय जवानांच्या शौर्याला अभिवादन केले. मोदींच्या या अचानक दौऱ्याची देशभर चर्चा रंगली. मात्र, या दौऱ्याची रणनिती आखली होती, ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी. सीमारेषेवरील तणावादरम्यान, थेटभेट देत मोदींनी आंतरराष्ट्रीय राजकीय डाव टाकला आहे.
लेह येथील सीमारेषेवर जाऊन मोदींना भारतीय सैन्याच्या पराक्रमाचं कौतुक केलं. तुम्हा जवानांचे धाडस व पराक्रमाचे ध्वनी देशाच्या कानाकोपऱ्यांत ऐकायला मिळत आहेत. गलवान खोऱ्यात भारतमातेच्या शत्रूंनी तुमच्यातील आग आणि संताप पाहिला आहे. आम्ही शांत आहोत, याचा अर्थ आम्हाला कोणी दुबळे समजू नये, असे म्हणत मोदींनी एकप्रकारे चीनला इशाराच दिला आहे. भारत-चीन सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख नरवणे यांच्यानंतर सीडीएस बिपिन रावत लेह-लडाखच्या दौऱ्यावर जाणार होते. तेथे ते एलएसीवरील सुरक्षेचा आढावा घेणार होते. मात्र, मोदींनी अचानक भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे हेही विमानतळावर मोदींच्या स्वागताला हजर होते. मोदींनी चीनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची भेट घेऊन विचारपूस केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लेह दौरा तोपर्यंत सार्वजनिक करण्यात आला नाही, जोपर्यंत मोदी लेहच्या मैदानात पोहोचत नाहीत. मोदींच्या या दौऱ्याची मोहीम एनएसए सल्लागार अजित डोवाल, बिपिन रावत आणि लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी आखली होती. मोदींच्या या दौऱ्यावेळी अजित डोवाल हे दिल्लीतच होते. गुरुवारी सायंकाळीच मोदींच्या लडाख दौऱ्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात अजित डोवाल यांनी सीडीएस बिपिन रावत यांच्याशी चर्चाही केली होती. यापूर्वीही पंतप्रधान मोदी, अजित डोवाल आणि बिपिन रावत यांनी 2017 मध्ये चीनच्या आक्रमकतेचा सामना केला होता, त्यावेळी चीनी सैन्य मागे हटले होते.
दरम्यान, मोदींनी लडाख येथील आपल्या भाषणातून सैन्याचं मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. बासरी वाजवणाऱ्या कृष्णाची प्रार्थना करणारे आम्ही आहोत, तसेच सुदर्शन चक्र धारण करणाऱ्या याच कृष्णाची प्रार्थनाही आम्ही करणारे आहोत, असे सांगून मोदी यांनी गलवान खोऱ्यात वीरमरण प्राप्त झालेल्या जवानांचा त्यांनी ‘भारतमातेचे अभिमान वाटावेत असे पुत्र’ या शब्दांत गौरव केला. शांतता आणि प्रगतीचे वातावरण विस्कळीत करण्याचा ज्या कोणी यापूर्वी प्रयत्न केला त्याला भारताने नेहमीच चोख प्रत्यूत्तर दिल्याची आठवण मोदी यांनी करून दिली. ते म्हणाले की, आज भारत नौदल, हवाई शक्ती आणि लष्करात शक्तिशाली बनतो आहे. शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण आणि देशाच्या संरक्षण क्षमतेच्या पायाभूत सुविधा अनेक पटींनी वाढवण्यात आल्या आहेत. सशस्त्रदलांच्या गरजांकडे सरकारचे पुरेसे लक्ष आहे.