मोदींचा ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नारा, एक हजार दिवसांत प्रत्येक गावात फायबर ऑप्टिक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 05:45 AM2020-08-16T05:45:11+5:302020-08-16T05:45:42+5:30
कोरोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत असल्याचे म्हटले.
नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने शारीरिक अंतर राखत पार पडला. लाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नारा देत नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचीही घोषणा केली. तब्बल ८६ मिनिटांच्या आपल्या भाषणात त्यांनी कोरोनाचे संकट आणि त्यावरील भारतीय लस, आत्मनिर्भर भारत मोहीम, परराष्ट्र नीती, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन, प्रत्येक गावात फायबर आॅप्टिकसह विविध विषयांवर विस्ताराने भाष्य केले.
भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्ब्युलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, अनेक लोक २४ तास आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असल्याचा आवर्जून उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्याला नमन केले. कोरोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत असल्याचे म्हटले.
कोरोनाच्या संकटातही भारताने आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प केला. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत एन ९५ मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आपण परदेशातून आयात करत होतो. आज या सर्व वस्तू आपण स्वत:च्या गरजा भागवत इतर देशांनाही पुरवतो आहोत. आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात कमी करणे नाही तर आपली क्षमता, सर्जनशीलता, कौशल्यही वाढवायला हवे. जगातील मोठमोठ्या कंपन्या आज भारताकडे वळत आहेत. ‘मेक इन इंडिया’सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ मंत्रासह पुढे वाटचाल करायला हवी. कोरोनाच्या संकटकाळात संशोधनातही भारताने आघाडी घेतली आहे. आजमितीस भारतात तीन तीन लसींची चाचणी सुरू आहे. तज्ज्ञांनी हिरवा कंदील दाखविताच या लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले जाईल. देशाच्या प्रत्येक गरजवंतापर्यंत लस पोहोचवण्यासाठी आराखडाही तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
>जम्मू-काश्मीरवासीयांना लवकरच मुख्यमंत्री मिळेल
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये कार्बन न्यूट्रल विकास मॉडेल राबवण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे काम वेगात सुरू आहे.
ही प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच तेथे निवडणुका होऊन जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपला आमदार, आपला मुख्यमंत्री मिळेल, असे मोदी म्हणाले.
>ठळक मुद्दे
कोरोनाच्या संकटकाळात संशोधनातही भारताची आघाडी
आजमितीस भारतात तीन तीन लसींची चाचणी सुरू
देशाच्या प्रत्येक गरजवंतापर्यंत लस पोहोचवण्यासाठी आराखडा तयार
गावागावात इंटरनेटचे जाळे निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्या भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणार
>नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’: मोदी यांनी महत्त्वाकांक्षी ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा केली. भारताच्या आरोग्य क्षेत्रात ही योजना मोठी क्रांती घडविणार आहे. तुमची प्रत्येक चाचणी, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरांनी कोणते औषध दिले, केव्हा दिले, अहवाल काय होते याची सर्व माहिती एका आरोग्य आयडीमध्ये उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
>लाल किल्ल्यावरील भाषणे; १९ वर्षांतील कालावधी
लाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ८६ मिनिटांचे भाषण केले. मागच्या १९ वर्षांतील तीन पंतप्रधानांचा लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा कालावधी पाहता मोदी यांची सात वर्षांची भाषणे ही आधीच्या पंतप्रधानांपेक्षा जास्त कालावधीची राहिली आहेत.
(भाषणाची वेळ मिनिटांमध्ये)