मोदींच्या सभास्थळी दीड महिन्यांपासून बॅरिकेडस् पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 05:53 PM2019-06-12T17:53:56+5:302019-06-12T17:54:08+5:30
बेफिकीर पोलिस यंत्रणा : रस्त्यावर अपघाताची शक्यता
पिंपळगाव बसवंत : लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिंडोरी व नाशिक मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेण्यात आली होती. मात्र, आता सभेला दीड महिन्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही पोलिस यंत्रणेला त्यांनी सभास्थळी टाकलेले बॅरिकेडस् उचलून नेता आलेले नाही. त्यामुळे सदर बॅरिकेडस् अस्ताव्यस्त पडले असून काही चोरीलाही गेल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे दि. २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जाहीर सभा झाली होती. या सभेची सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. सदर विशाल जागेत सापांचा वावर असल्याने पोलिस प्रशासनाने सर्पमित्रांची फौज तैनात केली होती शिवाय, पंतप्रधानांची सभा म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाय योजिले होते. मोदींच्या सभेआधीच पाच दिवस शेकडो लोखंडी बॅरीकेट लावण्यात आले होते. सदर बॅरिकेडस् जिल्हा भरातून आणण्यात आले होते. मात्र आता सभा होऊन जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरी सभास्थळी सदर बॅरिकेडस् बेवारस स्थितीत पडून असून पोलिस यंत्रणेला ते अद्याप उचलून नेण्यात वेळ मिळालेला नाही. त्यामुळे बरेच बॅरिकेडस रस्त्यावर येऊन पडल्याने अपघातही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे तर काही बॅरिकेडस् चोरी होत असल्याचीही चर्चा आहे.
अपघातात एकाचा बळी
पोलिसांनी सभास्थळी लावलेल्या याच बॅरीकेट मुळे पंधरा दिवसापूर्वी प्रकाश दिवरे या व्यक्तीचा मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला होता. तरीही पोलीस प्रशासनाने अजुनही बॅरीकेट बाबतीत दखल न घेतल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.