‘मन की बात’मधून मोदींनी दिला पाणी बचतीचा संदेश

By admin | Published: April 25, 2016 03:54 AM2016-04-25T03:54:40+5:302016-04-25T03:54:40+5:30

महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पाण्याची बचत करण्याचा संदेश दिला.

Modi's message of saving water in 'Man Ki Baat' | ‘मन की बात’मधून मोदींनी दिला पाणी बचतीचा संदेश

‘मन की बात’मधून मोदींनी दिला पाणी बचतीचा संदेश

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमातून पाण्याची बचत करण्याचा संदेश दिला. आपण पाण्याबाबत संवेदनशील असणे आवश्यक आहे. पाणी बचत ही लोकचळवळ बनली पाहिजे. जलसंवर्धनामुळे भूमिगत पाण्याची पातळी वाढेल आणि त्यासोबतच कृषी विकास होईल आणि जीडीपीमध्ये वृद्धी होईल. या दृष्टीने पावसाचे पाणी अडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न झाले पाहिजेत, असे आवाहन मोदी यांनी केले.
‘कितीही संकटे आली तरी एखादी गोड बातमी कानावर पडली की, सर्व संकटांचे निराकरण झाले, असे माणसाला वाटू लागते. हा मनुष्यस्वभाव आहे. यंदा मान्सून १०६ ते ११० टक्के बरसणार असल्याचा अंदाज वर्तविणारी माहिती सार्वजनिक झाल्यापासून एखादा मोठा शांतिसंदेश आल्यासारखे वाटू लागले आहे. अद्याप पाऊस पडायला वेळ आहे; परंतु चांगला पाऊस पडणार ही बातमीदेखील नवचैतन्य निर्माण करणारी ठरली आहे,’ असे मोदी म्हणाले.
यंदा भीषण उष्णतेने आनंदात विरजण घातले आहे. देश चिंतित होणे स्वाभाविक आहे. त्यातच दुष्काळ पडल्याने चिंता वाटते. सतत दुष्काळ पडल्याने जलसाठे कोरडे पडतात. अनेकदा विविध कारणांमुळे जलस्रोत आटतो. दुष्काळाचा सामना करण्यासाठी आणि पाणी संकटावर मात करण्यासाठी सरकारने प्रयत्न तर केलेच पाहिजेत; परंतु नागरिकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. अनेक गावांमध्ये पाण्याबाबत जागृती दिसते.

लोकांना पाण्याचे मूल्य कळले आहे, असे मोदी यांनी सांगितले.
>शिक्षणात गुणवत्ता हवी
शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. देशात शिक्षणाच्या विकासासाठी लोकसहभाग वाढला पाहिजे आणि शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यात आले पाहिजे, असे मोदी म्हणाले. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावातील लोकांनी पाणी बचतीसाठी केलेले प्रयत्न आणि पिकांच्या पॅटर्नमध्ये केलेला बदल याचा मोदींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.
शिक्षणाच्या दुरवस्थेबाबत मुंबईच्या शर्मिला धारपुरे हिने फोनवर चिंता व्यक्त केली होती, त्याचा उल्लेख करून मोदी पुढे म्हणाले, शर्मिलाची चिंता उचित आहे. पाल्यांना चांगले शिक्षण देणे हेच प्रत्येक पालकाचे स्वप्न आहे. शिक्षणाच्या विकासासाठी अधिक जनजागृती व्हायला पाहिजे.
गावकऱ्यांनी जास्त पाणी लागणारी ऊस, केळी यासारखी पिके न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
>ग्राम उदय हीच
भारत उदयाची हमी
‘ग्राम उदयातून भारत उदय’ कार्यक्रम राबविल्याबद्दल राज्य सरकारांसह सर्व पक्षांचे आभार व्यक्त करून मोदी म्हणाले की, ग्राम उदय हीच भारत उदयाची हमी आहे. आपले सरकार ग्राम उदयवर जोर देत राहील. हा कार्यक्रम गावाच्या विकासासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी एका संधीच्या रूपात परिवर्तित केला पाहिजे.

Web Title: Modi's message of saving water in 'Man Ki Baat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.