मोदींचे ‘पीस मिशन’
By admin | Published: May 19, 2016 05:29 AM2016-05-19T05:29:12+5:302016-05-19T05:29:12+5:30
मोदींच्या डोक्यात सध्या ‘पीस मिशन’ असून, शांतता आणि सलोख्यासाठी खास मंत्रालय स्थापन करण्यासोबतच मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेतही मिळाले
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यात सध्या ‘पीस मिशन’ असून, शांतता आणि सलोख्यासाठी खास मंत्रालय स्थापन करण्यासोबतच मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेतही मिळाले आहेत. मंत्रिमंडळाच्या खांदेपालटाचा अंक पार पाडला जाईल, तेव्हा शांतता मंत्रालयाची घोषणा केली जाऊ शकते, असे त्यांच्या निकटस्थ सूत्रांनी सांगितले आहे.
गृहमंत्रालयाच्या अखत्यारित जातीय सलोख्यासाठी स्थापन करण्यात आलेला आयोग अपेक्षित उद्दिष्ट साध्य करू शकला नसल्याचे मोदींना वाटते. विविध समुदायांमध्ये सलोखा आणि शांतता राखण्यात अल्पसंख्यक मंत्रालयालाही यश मिळालेले नाही. त्यामुळे स्वतंत्र शांतता मंत्रालयच हा उद्देश साध्य करू शकेल, असा मोदींना विश्वास आहे. नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरातला मोदींनी भेट दिली, त्यावेळी वेगवेगळ्या स्वरूपात अशी मंत्रालये असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तूर्तास मोदींच्या डोक्यातील ही कल्पना अगदी बाल्यावस्थेत असून, अद्याप पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ)त्यासंबंधी आराखड्याचा विचारही केलेला नाही. शांतता आणि समाधान मंत्रालय स्थापन करण्याची कल्पना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी गेल्या महिन्यात मोदींची भेट घेतली, त्या वेळी मांडली होती.
राज्यातील जनतेच्या समाधानाचा आलेख मोजण्यासाठी तसा विभाग स्थापन करण्याची घोषणा करण्याचा विचार चौहान यांनी या भेटीत बोलून दाखविला होता.
>मोदी जाणार मंत्र्यांच्या दारी.....
आश्चर्याची बाब म्हणजे, मोदींनी सहा ज्येष्ठ मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जात संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, वाहतूकमंत्री नितीन गडकरी, विदेशमंत्री सुषमा स्वराज आदींचा त्यात समावेश आहे.
या आधी मोदी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निवासस्थानालाच भेट देत असत. अलीकडे त्यांनी स्वराज यांना उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पायधूळ झाडली होती. संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानीही ते अधूनमधून जात होते.
मंत्र्याशी संवादाविना निर्णय घेण्याचा भाग आता इतिहासजमा होणार आहे. अलीकडेच मोदींनी या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांसोबत चर्चेची पहिली फेरी पूर्ण केली आहे. मोदींच्या शांतता मंत्रालयाच्या भाग म्हणून मोदींनी पीस मिशन अवलंबले असावे.
भोजन बैठकींतून मंत्र्यांशी संवाद...
शांतता मंत्रालय कधीही स्थापन होवो. सध्या तरी मोदींनी वैयक्तिक पातळीवर पीस मिशन चालविले आहे, ते डीनर डिप्लोमसी सुरू करीत. ज्येष्ठ मंत्र्यांशी समोरासमोर थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी भोजन बैठकींची मालिका चालविली आहे. मोदींचा आपल्यावर विश्वास नाही, निर्णयापूर्वीही ते आपल्याशी सल्लामसलत करीत नाही, अशी खंत दीर्घ काळापासून मंत्र्यांना वाटते आहे.