हिटलर-लादेनसोबत छापला मोदींचा फोटो, चौघांना अटक
By Admin | Published: June 11, 2014 09:48 AM2014-06-11T09:48:23+5:302014-06-11T12:44:19+5:30
निगेटिव्ह लोकांच्या लिस्टमध्ये हिटलर व ओसामा बिन लादेन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेऊन बसवल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
>ऑनलाइन टीम
त्रिशूर , दि. ११ - निगेटिव्ह लोकांच्या लिस्टमध्ये हिटलर व ओसामा बिन लादेन यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदींना नेऊन बसवल्याप्रकरणी केरळमधील एका कॉलेजचे प्राचार्य व चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.केरळमधील कुझूर येथील एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या कॅम्पस मॅगझीनमध्ये नकारात्मक लोकांच्या लिस्टमध्ये मोदींचा फोटो छापण्यात आला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१३ -१४ सालचे कॅम्पस मॅगझीन ४ जून रोजी प्रकाशित करण्यात आले. या मॅगझीनच्या एका पानाचे शीर्षक 'नकारात्मक चेहरे' असे असून त्यात अॅडॉल्फ हिटलर, लिट्टे नेता प्रभाकरन,चंदन तस्कर वीरप्पन, अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन यांचे फोटो आहेत. त्यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांचाही फोटो छापण्यात आला आहे. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचेही नाव या यादीत आहे.
याप्रकरणी केरळमधील सामाजिक कार्यकर्ता सुभाष यांनी या मासिकाविरोधात तक्रार दाखल केली होती.त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी कॉलजचे प्राचार्य, मासिकाचे संपादक आणि प्रकाशकावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान स्थानिक बाजप कार्यकर्त्यांनी या प्रकरणी निदर्शने करत मॅगझीनच्या आवृत्त्याही जाळल्या. या सर्व प्रकारानंतर कॉलेजच्या म२नेजमेंटने हे मॅगझिन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.