गांधीजींसमवेत मोदींच्या चित्राची २५ लाखांना विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 11:25 PM2019-10-25T23:25:30+5:302019-10-25T23:25:58+5:30
सर्वात मोठी बोली : पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव; रक्कम नमामिगंगे योजनेसाठी दान करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव करण्यात आला. त्यामध्ये महात्मा गांधी यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चित्राला सर्वात मोठी बोली मिळून ते २५ लाख रुपयांना विकले गेले.
या ई-लिलावातून मिळालेली सर्व रक्कम नमामिगंगे योजनेसाठी दान करण्यात येईल. पंतप्रधानांना मिळालेल्या २,७७२ वस्तूंचा केंद्रीय सांस्कृतिक खात्याने १४ सप्टेंबरपासून ई-लिलाव सुरू केला होता. दिल्लीतील नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे या साऱ्या वस्तू सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये चित्रे, शिल्प, शाली, जाकीट, संगीत वाद्ये आदींचा समावेश होता.हा ई-लिलाव ३ आॅक्टोबरपर्यंतच सुरू राहणार होता. मात्र नंतर त्याची मुदत आणखी ३ आठवड्यांनी वाढविण्यात आली होती.
या सर्व भेटवस्तूंची आता विक्री झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंची अभिनेता अनिल कपूर, अर्जुन कपूर, गायक कैलाश खेर यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत, नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनी खरेदी केली. महात्मा गांधी यांच्यासमवेत असलेल्या मोदींच्या चित्रासाठी मूळ किंमत अडीच लाख रुपये ठेवण्यात आली होती. या चित्राला सर्वात मोठी बोली मिळाली.
एका छायाचित्राला २० लाख रुपये
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेत असल्याच्या छायाचित्राची मूळ किंमत हजार रुपये ठेवण्यात आली होती; पण ई-लिलावात ते २० लाख रुपयांना विकले गेले. मणिपुरी लोककलेच्या वस्तूंची मूळ ंिकंमत ५० हजार रुपये असताना मोठी बोली मिळून ते १० लाख रुपयांना विकण्यात आले. गाय व तिचे स्तनपान करणारे वासरू या धातूशिल्पाची मूूळ किंमत चार हजार रुपये असताना त्याची १० लाख रुपयांना विक्री झाली. स्वामी विवेकानंद यांचा १४ सेमी उंचीचा पुतळा एकाने लिलावात ६ लाख रुपयांना खरेदी केला.