टिष्ट्वटरवर मोदींच्या वक्तव्याचा निषेध
By admin | Published: May 20, 2015 02:47 AM2015-05-20T02:47:46+5:302015-05-20T02:47:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व आशियाच्या दौऱ्यामध्ये केलेल्या भाषणांमध्ये भारतीयांचा अपमान केला, अशा आशयाची विधाने करीत टिष्ट्वटरवर त्यांच्याविरोधात प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व आशियाच्या दौऱ्यामध्ये केलेल्या भाषणांमध्ये भारतीयांचा अपमान केला, अशा आशयाची विधाने करीत टिष्ट्वटरवर त्यांच्याविरोधात प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. चीन आणि कोरियामध्ये भाषण करताना आपण पंतप्रधान होण्यापूर्वी नागरिकांना भारतीय असण्याची शरम वाटायची, असे विधान केले होते. याच विधानाचा टिष्ट्वटरवर समाचार घेतला जात आहे.
सततच्या परदेश दौऱ्यांमुळे चर्चेत येणारे पंतप्रधान त्यांच्या तेथील भाषणांमुळेही चर्चेत आणि वादाच्या गर्तेत सापडत आहेत. मॉरिशस असो वा अमेरिका, पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील भारतीयांना भेटतात. शांघायमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर बोलताना यापूर्वी तुम्हाला भारतात जन्मल्याबद्दल लाज वाटायची, मागील वर्षी भारतात नवे सरकार येण्याची इच्छा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी बाळगली होती. आता तुम्हाला भारताचे प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटत असेल. असे विधान केले होते. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी अशाच आशयाची विधाने द. कोरियामध्ये सेऊल येथे बोलतानाही केली. त्यामुळेच त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहेत.
अशी होत आहे टीका
पंतप्रधानांच्या विधानांचा निषेध करणाऱ्यांमध्ये राजकीय व्यक्ती, प्रवक्ते, पत्रकार तसेच सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. आम्हाला भारतीय असण्याची कधीच लाज वाटली नव्हती असा सूर या प्रतिक्रियांमध्ये उमटला आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या पदाचा विचार करून परदेशात बोलायला हवे, आता निवडणूका संपल्या आहेत असे सल्लेही त्यांना देण्यात आले आहेत.
शब्दांमध्ये अडकले पंतप्रधान
वक्तृत्वशैली आणि विविध नव्या उपमा, संज्ञांच्या वापरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे नेहमीच चर्चेमध्ये येतात. मौत का सौदागर या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केलल्या टिकेला त्यांनी मी मतोंका सौदागर आहे असे त्यांना म्हणायचे असावे, अशा शब्दांमध्ये टीका परतवली होती. मी पंतप्रधान होताच वर्षभरात परिस्थिती कशी पालटली हे सांगण्याचा प्रयत्न करताना मात्र ते आपल्याच शब्दांमध्ये अडकले. आपल्या कारकिर्दीच्या महतीपेक्षा भारतीयांचा अपमानच जास्त झाल्याचा अर्थ लोकांनी घेतला आणि त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला.
नरेंद्र मोदी यांनी केवळ १२५ कोटी भारतीयांचा अपमान केलेला नाही, तर आपले आजोबा, पणजोबा, पूर्वज आणि स्वातंत्र्यसैनिकांचाही अपमान केला आहे
-संजय झा. प्रवक्ते, काँग्रेस
मी इंग्लंडमध्ये जन्मलो, पण श्रीयुत पंतप्रधान, मला भारतीय पारपत्र दाखवताना कधीही लाज वाटली नाही.
- ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री