मोदींच्या रशिया भेटीत होणार अणुसहकार्य करार
By admin | Published: December 20, 2015 11:14 PM2015-12-20T23:14:24+5:302015-12-20T23:14:24+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या युरेशियन देशांच्या दौऱ्यात अणुऊर्जा क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेने पाऊल टाकत
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या युरेशियन देशांच्या दौऱ्यात अणुऊर्जा क्षेत्रातील परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या दिशेने पाऊल टाकत भारत आणि रशिया यांच्यादरम्यान कुडानकुलमच्या पाचव्या आणि सहाव्या संयंत्राबाबतच्या एका करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे.
देशाची विजेची वाढती गरज भागविण्यासाठी सध्याच्या अणुविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी जास्तीत जास्त अणुभट्ट्या उभारण्याचा सरकारचा विचार आहे, असे सूत्रांनी सांगितले. मोदी हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासोबत मॉस्को येथे वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी बुधवारी रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यापूर्वी भारताच्या अणुऊर्जा विभागाच्या समकक्ष असलेल्या रोसातोमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निकोलाय स्पास्की यांनी ७ व ८ डिसेंबर रोजी भारताचा दौरा केला होता.
या दौऱ्यात स्पास्की यांनी मोदींच्या रशिया दौऱ्याच्या वेळी कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या संयंत्राबाबतच्या करारावर स्वाक्षरी होण्याच्या शक्यतेबाबत अणुऊर्जा विभागाचे सचिव शेखर बसू यांच्यासोबत चर्चा केली होती.
(लोकमत न्यूज नेटवर्क)