मोदींचा सलग दुसरा राज्याभिषेक गुरुवारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:29 AM2019-05-25T06:29:46+5:302019-05-25T06:30:33+5:30
सेकंड इनिंग्जची जय्यत तयारी : अतिभव्य सोहळ्याची आखणी
- हरिश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या इनिंग्जची जय्यत तयारी सुरू झाली असून, पंतप्रधान मोदी यांचा राज्याभिषेक बहुधा येत्या गुरुवारी ३० मे रोजी होईल, असे संकेत आहेत. या वेळच्या जनादेशाची भव्यता लक्षात घेऊन मंत्रिमंडळ स्थापनेचा सोहळाही सन २०१४ हूनही अधिक भव्य स्वरूपात व्हावा, अशी भारतीय जनता पक्षाची योजना असून, त्याचे स्वरूप व ठिकाण येत्या दोन दिवसांत ठरू शकेल.
या तयारीचा सरकारी पातळीवरील औपचारिक भाग म्हणून मोदींच्या नेतृत्वाखालील विद्यमान मंत्रिमंडळाची शुक्रवारी सायंकाळी शेवटची बैठक झाली. या बैठकीत सध्याची १६वी लोकसभा विसर्जित करण्याचा आणि मोदी यांच्या आभाराचा, असे दोन ठराव मंजूर करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली व लोकसभा विसर्जनाच्या शिफारशीचा मंत्रिमंडळाचा ठराव त्यांना सादर केला. त्यासोबतच मोदींनी आपल्या सध्याच्या मंत्रिमंडळाचा औपचारिक राजीनामाही राष्ट्रपतींना सोपविला. तो स्वीकारून नवे सरकार स्थापन होईपर्यंत मोदी यांनीच पंतप्रधानपद सांभाळावे, असे निर्देश राष्ट्रपतींनी दिले. मोदींच्या दुसºया इनिंग्जच्या पक्षीय पातळीवरील तयारीचा पहिला टप्पा म्हणून ‘रालोआ’ संसदीय पक्षाची बैठक संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शनिवारी बोलाविण्यात आली आहे. त्यात ‘रालोआ’च्या नेतेपदी मोदी यांची औपचारिक निवड केली जाईल. त्यानंतर नवे सरकार स्थापन करण्यासाठी मोदींना पाचारण करण्याची राष्ट्रपतींना विनंती केली जाईल. याला जोडूनच भाजप संसदीय मंडळाची बैठक होईल व त्यात भावी मंत्रिमंडळाची रचना व शपथविधी याविषयी निर्णय घेण्यात येईल.
गेल्या वेळी मोदींचा पहिला शपथविधी प्रथेप्रमाणे राष्ट्रपती भवनाच्या अशोका दालनात न होता त्याच भवनाच्या पुढील भागासमोरील प्रशस्त आवारात झाला होता. यावेळी त्याहून भव्य सोहळा तेथेच घ्यायचा झाल्यास तो कसा असावा व अन्यत्र घ्यायचा झाल्यास कुठे घ्यावा याविषयी सक्रियतेने विचार सुरु आहे. गेल्या वेळी मोदींच्या शपथविधीला ‘सार्क’ देशांच्या नेत्यांना मुद्दाम निमंत्रित करण्यात आले होते. सूत्रांनुसार यावेळी केवळ ‘सार्क’च नव्हे तर जगातील अन्य प्रमुख लोकशाही देशांच्या नेत्यांनाही निमंत्रण दिले जावे, अशी स्वत: मोदींची इच्छा आहे. यामुळेही शपथविधी लगेच न होता कदाचित ३० तारखेला केला जाऊ शकेल. भारतीय लोकशाही ही जगात सर्वात मोठी आहे. शिवाय अन्य लोकशाही देशांमध्ये सध्या पदावर असलेल्या कोणत्याही नेत्याहून मोदींना आता मिळालेला जनाधार मोठा आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत मोदींनी ५० हून अधिक देशांचे दौरे करून अनेक जागतिक नेत्यांशी व्यक्तिगत नाते जोडले आहे. हे सर्व विचारात घेऊन यावेळचा मोदींचा राज्याभिषेक जगातील एक मोठी घटना म्हणून साजरा व्हावा, असा यामागचा विचार असल्याचे समजते.
नवी लोकसभा स्थापन झाल्यावर तिचे पहिले अधिवेशन बहुधा जूनच्या १० तारखेच्या सुमारास सुरु होईल. सुरुवातीस सर्व नव्या सदस्यांना शपथ द्यावी लागेल. त्यासाठी हंगामी लोकसभा अध्यक्ष नेमावा लागेल. भाजपाचे ज्येष्ठ सदस्य संतोष गंगवार यांची त्या पदासाठी निवड होण्याची शक्यता आहे.
नव्या वित्तमंत्र्याचा शोध
पूर्ण अर्थसंकल्प मांडणे हे नव्या मोदी सरकारपुढील पहिले व सर्वात मोठे काम असेल. निवडणुकीआधी अंतरिम अर्थसंकल्प मंजूर करून घेण्यात आला होता व त्यातील तरतुदी ३० जून अखेरपर्यंत आहेत. आजारी विद्यमान वित्तमंत्री अरुण जेटली विश्रांती घेत असून त्यांनी नव्या सरकारमध्ये मोठी जबाबदारी सांभाळणे प्रकृतीमुळे शक्य होणार नाही, असे कळविले आहे. मोदींनी जेटलींच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांची भेट घेतली व जेटलींनी वित्तमंत्री म्हणून कायम राहावे, अशी आपली इच्छा त्यांना कळविल्याचे समजते. पण जेटलींनी मनात आणले तरी प्रकृती कितपत साथ देईल यावर ते अवलंबून असेल. जेटली नाहीत हे नक्की झाले की नवे वित्तमंत्री म्हणून पियुष गोयल यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले. जेटलींच्या आजारपणात गोयल यांनी ही जबाबदारी पूर्वी सांभाळलेली आहे.
अमित शहांची पसंती मंत्रिपदाहून पक्षाला?
विजयात सिंहाचा वाटा असलेले पक्षाध्यक्ष अमित शहा मंत्रिमंडळात येणार का, हाही कळीचा मुद्दा आहे. तयार झाल्यास गृहमंत्रिपद देऊन राजनाथ सिंग यांना लोकसभा अध्यक्ष करायचे, असाही विचार आहे. अर्थात, अमित शहा यांनी मंत्री व्हायला होकार दिला, तरच राजनाथसिंग याच्या नावाचा अध्यक्षपदासाठी विचार होईल, तसेच मावळत्या मंत्रिमंडळातील संसदीय कायर्मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना लोकसभेचे अध्यक्ष केले जाऊ शकते. अमित शहा यांच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार शहा मंत्री व्हायला उत्सुक नाहीत. पुढील वर्षी दिल्ली विधानसभा व सन २०२१ मध्ये त्यांना प. बंगाल विधानसभा जिंकून दाखवायची आहे.