Narendra Modi: नव्या संसद भवनाच्या उदघाटनावर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर मोदींची घणाघाती टीका, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 01:38 PM2023-05-25T13:38:02+5:302023-05-25T13:38:37+5:30
New Parliament House: राजधानी दिल्लीत बांधण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे. संसदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असल्याने त्यावर काँग्रेससह अनेक प्रमुख पक्षांनी बहिष्कार घातला आहे.
राजधानी दिल्लीत बांधण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे. संसदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार असल्याने त्यावर काँग्रेससह अनेक प्रमुख पक्षांनी बहिष्कार घातला आहे. अनेक प्रमुख नेत्यांनी पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला विरोध केला आहे. तसेच उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, आता यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर घणाघाती टीका केली आहे.
मोदी म्हणाले की, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात तेथील सर्व नेते उपस्थित होते. पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते असे सर्वजण कार्यक्रमात एकत्रितपणे सहभागी झाले होते. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रितरीत्या सन्मान केला. असे मोदींनी सांगितले. तीन देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दिल्लीत परतले. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, मी जगभरातील देशांमध्ये जाऊन तेथील नेत्यांना भेटून भारताच्या सामर्थ्याबाबत बोलतो. माझ्या देशाच्या महान संस्कृतीचा गुणगौरव करताना माझी नजर कधी खाली झुकत नाहीत. मी नजरेला नजर भिडवून बोलतो. आव्हानांना आव्हान देणं हा माझा स्वभाव आहे.
आज जग भारताचं मत ऐकायला आतूर आहे. हे यश मोदींचं नाही तर भारताचं आहे. १४० कोटी भारतीयांचं आहे. जेव्हा मी परदेशात जाऊन काही बोलतो, तेव्हा जग माझ्यावर विश्वास ठेवतं. हाच विश्वास भारतीयांची शक्ती आहे. हे जे सामर्थ्य आहे ते तुमच्या पूर्ण बहुमताच्या सरकारमुळे आहे.