रांगा कधी संपणार यावर मोदींचं मौन
By admin | Published: December 31, 2016 08:54 PM2016-12-31T20:54:40+5:302016-12-31T20:54:40+5:30
नोटाबंदी निर्णयाची घोषणा केल्यानंतर बँका आणि एटीएमबाहेर लागलेल्या रांगा कधी संपतील यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील अशी अपेक्षा होती
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - नोटाबंदी निर्णयाची घोषणा केल्यानंतर बँका आणि एटीएमबाहेर लागलेल्या रांगा कधी संपतील यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र सरत्या वर्षाला निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करताना मात्र या विषयावर मौन बाळगलं. 50 दिवसानंतर परिस्थिती सुधारेल असं मोदी बोलले होते. मात्र बँकांचा सामान्य परिस्थितीत जाण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत मोदींनी अप्रत्यक्षरित्या परिस्थिती सुधारायला वेळ लागेल असं मान्य केलं आहे.
मोदींनी नवीन वर्षात बँकांना सामान्य परिस्थितीत नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं सांगितल आहे. संबंधित अधिका-यांना यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं असल्याचं मोदींनी सांगितलं. विशेष करुन ग्रामीण आणि दुर्गम भागात लक्ष देण्याची गरज असल्याचंही मोदी बोलले आहेत.
Yet people have faced problems for betterment of nation, this is your blessing. Govt will try to normalise situation in banks in new year-PM
— ANI (@ANI_news) 31 December 2016
मोदींनी नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला देशवासियांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदीप्रमाणे काहीतरी नवीन घोषणा करुन पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का देतील अशी अपेक्षा होती. मात्र मोदींनी अशी काही घोषणा न करता नव्या योजनांची यादी जाहीर केली. यावेळी मोदींनी पुन्हा एकदा नोटाबंदी निर्णयाचा उल्लेख करत झालेले फायदे आणि निर्णय घेण्यामागची कारणं सांगितली.
जे शुद्धी यज्ञ चाललं ते देशाच्या विकासात मदत करेल. भ्रष्टाचार, काळा पैशा यासमोर झुकण्यासाठी लोक मजबूर झाले होते, सर्वजण गुदमरत होते, सर्वांना यामधून मुक्तता हवी होती. 8 नोव्हेंबरनंतर देशवासियांच्या संयमाने चांगलं आणि वाईट याचा फरक दाखवून दिला आहे असं सांगताना मोदींनी 'कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी' असं काहीसं देशवासियांनी जगून दाखवलं असल्याचं सांगितलं.
8 नोव्हेंबरनंतरच्या घटना आपल्याला पुनर्विचार करायला लावतात. जनशक्तीचं सामर्थ्य काय असतं, प्रशासन कशाला म्हणतात दाखवून दिलं. देशवासियांनी जे कष्ट झेललं ते सर्वांसाठी उदाहरण आहे. सत्य आणि चांगल्या कामासाठी जनता आणि सरकारने खांद्याला खांदा लावून लढा दिला असं मोदी बोलले आहेत. तसंच नोटाबंदीमुळे लोकांना त्रास झाला, लोकांनी मला चिठ्ठी लिहून आपला त्रास सांगितला. हे सर्व मला आपलं माणूस म्हणून सांगण्यात आलं असंही मोदी बोलले आहेत.
देशातील फक्त 24 लाख लोकांनी आपलं उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त असल्याचं मान्य केलं असल्याची धक्कादायक माहिती यावेळी मोदींनी दिली. कायदा कठोरपणे आपलं काम करणार, मात्र इमान इतबारे काम करणा-या लोकांन कशी मदत मिळेल याकडेही लक्ष देणार असल्याचं मोदी बोलले आहेत.
According to data, only 24 lakh people in the country have declared that their salary is above Rs 10 lakh under Income Tax: PM Modi pic.twitter.com/OFzi6GYTOl
— ANI (@ANI_news) 31 December 2016
दहशतवादी, नक्षलवादी काळ्या पैशावरच अवलंबून असतात, नोटाबंदी निर्णयामुळे या सगळ्यांना चांगलाच फटका बसला. तंत्रज्ञानाच्या मदतीने भ्रष्टाचार करणा-यांवर बंधन आणण्यास मदत झाली. हे सरकार सज्जनांचं आहे आणि दुर्जनांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. भारतातील बँकांमध्ये इतका पैसा एकाच वेळी कधीच आला नव्हता. बँकांनी गरिब, मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्यास सुरुवात करावी असं आवाहन मोदींनी यावेळी केलं.
महत्वाच्या योजनांची घोषणा -
- देशातील अनेक गरिबांकडे आपलं स्वत:चं घर नाही, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवीन घर देण्यासाठी नवीन योजना आणल्या आहेत. 9 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 4 टक्के तर 12 लाखांच्या कर्जावर 3 टक्क्यांची सूट दिली जाणार
- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गावांमध्ये 33 टक्के नवीन घरं बांधली जाणार
- शेती नष्ट झाली असा प्रचार करणा-यांना शेतक-यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे.
- जिल्हा सहकारी बँकांमधून खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज घेतलं असल्यास 60 दिवसांचं व्याज माफ करुन शेतक-यांच्या खात्यात जमा करणार आहे
- आगामी तीन महिन्यात 3 कोटी किसान क्रेडिट कार्डचं रुपांतर Rupay कार्डमध्ये होणार, यामुळे कुठेही खरेदी - विक्री करणं सोपं होईल
- लघुउद्योगांसाठी 1 कोटीऐवजी 2 कोटींचं कर्ज मिळणार
- भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे, ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यातील साडे सात लाख रुपयांपर्यतच्या रकमेवर 8 टक्क्यांचा व्याजदर दिला जाईल, दर महिन्याला व्याजाचे पैसे ते घेऊ शकतात - नरेंद्र मोदी.
- गर्भवती महिलांना केंद्राकडून 6 हजार रुपयांची मदत मिळणार, माता मृत्यू दर कमी करण्यासाठी गर्भवती महिलांना मदत