मोदींची ‘मौन’ की बात !
By admin | Published: June 29, 2015 03:40 AM2015-06-29T03:40:30+5:302015-06-29T03:40:30+5:30
नरेंद्र मोदींची ‘मन की बात’ त्यात ते जे बोलले त्याहूनही जे बोलले नाहीत त्यावरून अधिक लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरली.
नवी दिल्ली/हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘आकाशवाणी’वरील त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे देशवासीयांशी थेट संवाद साधला. पण मोदींची ही ‘मन की बात’ त्यात ते जे बोलले त्याहूनही जे बोलले नाहीत त्यावरून अधिक लक्षवेधी आणि वादग्रस्त ठरली.
२० मिनिटांच्या या कार्यक्रमात मोदी योगापासून ते मुलींच्या घटत्या जन्मदराबद्दल तळमळीने बोलले. पण ‘आयपीएल’चे वादग्रस्त कमिशनर ललित मोदी यांना मदत केल्यावरून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांच्याभोवती घोंघावणाऱ्या वादळावर पंतप्रधानांनी एका शब्दानेही भाष्य न केल्याने त्यांचे मौन शब्दांहूनही अधिक बोलके ठरले. साहजिकच आधीपासून हा मुद्दा लावून धरलेल्या विरोधकांना टीकेला नवा विषय आणि नवा जोर मिळाला. पंतप्रधानांच्या या मौनावर काँग्रेसने जोरदार हल्ला केला. आयपीएल घोटाळ्यातील आरोपी असलेल्या ललित मोदींना पंतप्रधान मदत करीत असल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी केला. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनीही मोदींवर तोफ डागली.
पंतप्रधानांना थेट लक्ष्य करताना दिग्विजयसिंग म्हणाले की, पंतप्रधानांनी ‘मन की बात’ केली. मात्र गत पंधरवड्यापासून ललित मोदी प्रकरणातून निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे देणे त्यांनी टाळले. ललित मोदींना पंतप्रधान मदत करीत आहे, हा माझा आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालयाने चालविलेल्या चौकशीच्या कचाट्यातून सहीसलामत सुटका करण्याचे आश्वासन त्यांनी ललित मोदींना दिले आहे. काँग्रेसने हे प्रकरण लावून धरले आहे. पण भाजपाकडे आमच्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही, असा ठपका दिग्विजय यांनी ठेवला. पंतप्रधानांना मीडियाच्या प्रकाशझोतात राहणे आवडते. म्हणून ते प्रत्येक मुद्यावर टष्ट्वीट करतात पण महत्त्वाचे मुद्दे मात्र जाणीवपूर्वक टाळतात, असा टोलाही त्यांनी लगावला.