आरटीआयसाठी मोदींचा ‘थ्री टी मंत्र’
By admin | Published: October 16, 2015 11:40 PM2015-10-16T23:40:33+5:302015-10-16T23:40:33+5:30
सध्याच्या काळात गोपनीयतेला कोणतेही स्थान नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागवण्यात आलेले उत्तर वेळेत पारदर्शकता राखत आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही
नवी दिल्ली : सध्याच्या काळात गोपनीयतेला कोणतेही स्थान नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) मागवण्यात आलेले उत्तर वेळेत पारदर्शकता राखत आणि कोणतीही अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीने जनतेकडे दिले जावे. त्यासाठी त्यांनी ‘टाइमली, ट्रान्स्परन्ट आणि ट्रबल-फ्री’ हा ३ टीचा मंत्र सांगितला.
केंद्रीय माहिती आयोगाच्या १० व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते. माहितीचा अधिकार कायदा सर्वसामान्यांसाठी असून त्यांना सत्तेवर असलेल्यांना जाब विचारण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. आपण पारदर्शकता अधिक बळकट केल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास आणखी दृढ होईल, असे ते म्हणाले.
माहिती मागवण्याची प्रक्रिया पारदर्शक असावी. विलंबाने मिळालेली माहिती प्रश्न सोडविण्यास मदत करीत नाही, उलट तो वाढविण्यास हातभार लावते. वेळीच दिलेल्या माहितीमुळे चुकीचे निर्णय रोखले जाऊ शकतात. आम्ही त्यावर भर देत आहोत, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आरटीआयच्या मूळ कल्पनेला पूरक अशीच महत्त्वांकाक्षी डिजिटल इंडिया योजना आहे. अधिकाधिक बाबी आॅनलाईन झाल्या की, पारदर्शकता आणखी वाढेल. प्रश्न उपस्थित करण्याला वाव दिला जावा.
एखाद्या नागरिकाने छोटाही प्रश्न विचारल्यास धोरणात्मक बदल घडविणे भाग पडू शकते. सत्तेवर असलेल्यांना योग्य जाब विचारण्याचे अस्त्र सर्वसामान्यांच्या हाती आले आहे.