मोदींचा ‘टाईम मॅनेजमेंट’ फंडा
By Admin | Published: April 10, 2016 03:48 AM2016-04-10T03:48:25+5:302016-04-10T03:48:25+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौऱ्यातील वेळेचे व्यवस्थापन बघून अधिकारीही चकित झाले आहेत. वेळेचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी पंतप्रधानांनी रात्री एखाद्या
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विदेश दौऱ्यातील वेळेचे व्यवस्थापन बघून अधिकारीही चकित झाले आहेत. वेळेचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी पंतप्रधानांनी रात्री एखाद्या हॉटेलमध्ये विश्राम करण्याऐवजी विमानातच प्रवासात झोप घेतली आणि बहुतांश कार्यक्रम सकाळी ठेवले. त्यामुळे त्यांना अनेक लोकांच्या भेटीगाठी घेता आल्या.
गेल्या ३० मार्च ते २ एप्रिल या कालावधीत पंतप्रधान मोदी यांनी बेल्जियम, अमेरिका आणि सौदी अरबचा दौरा केला. या पाच दिवसांच्या प्रवासात त्यांनी तीन रात्री एअर इंडिया वनमध्येच घालवल्या आणि फक्त दोन रात्री विदेशी हॉटेलमध्ये आराम केला. दिल्ली ते बेल्जियम, ब्रसेल्स ते वॉशिंग्टन आणि तेथून रियादला जाण्याकरिता मोदींनी जाणीवपूर्वक रात्रीची वेळ निवडली होती.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान फक्त दोन दिवस हॉटेलमध्ये थांबले होते. एक दिवस वॉशिंग्टन आणि एक दिवस रियादला. केवळ ९७ तासांत त्यांनी अमेरिकेसह अनेक देशांचा दौरा केला असून, हे कुणालाही अविश्वसनीय वाटावे असेच आहे. पंतप्रधानांनी वेळेचा अशा पद्धतीने वापर केला नसता, तर हा दौरा ठराविक कालावधीत पूर्ण होणे शक्य नव्हते. त्यांनी विमानात झोपण्याचा निर्णय घेतला नसता, तर या दौऱ्याला किमान सहा दिवस लागले असते.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा विदेश दौरा मात्र अपेक्षेपेक्षा अधिक दिवसांचा राहत होता आणि बहुतांश वेळेला तो एका शहरापुरताच मर्यादित असायचा, असेही या अधिकाऱ्याने नामोल्लेख न करण्याच्या अटीवर सांगितले. फार कमी लोक रात्रीचा प्रवास करतात.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
दोन वर्षांत ९५ दिवस विदेश दौरा
आपल्या पहिल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात मोदी ९५ दिवस विदेश दौऱ्यावर होते. या कालावधीत मनमोहनसिंग यांनी ७२ दिवस विदेशात घालवले.
मोदी यांनी आतापर्यंत २० विदेश दौऱ्यांमध्ये ४० देशांना भेटी दिल्या. दुसरीकडे एवढ्याच कालावधीत संपुआ (एक)च्या कार्यकाळात मनमोहनसिंग यांनी १५ विदेश दौऱ्यांत १८ देशांना भेटी दिली होती. संपुआ (दोन)मध्ये पंतप्रधानपदी असताना त्यांनी दोन वर्षांत १७ विदेश दौऱ्यांमध्ये २४ देशांचा प्रवास केला.