महिलांसाठी माेदींचे ‘ट्रम्प कार्ड’?; पंतप्रधान लवकरच करणार एका मोठ्या योजनेची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 06:26 AM2023-09-23T06:26:13+5:302023-09-23T06:26:39+5:30
२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचा म्हणजेच महिलांच्या मताचा मोठा भाग मिळू शकतो, जो आजवर भाजपला मिळू शकत नव्हता
संजय शर्मा
नवी दिल्ली : २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्रंप कार्ड मानले जात आहे. महिलांना आरक्षण दिल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांसाठी लवकरच एका मोठ्या योजनेची घोषणा करू शकतात.
२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचा म्हणजेच महिलांच्या मताचा मोठा भाग मिळू शकतो, जो आजवर भाजपला मिळू शकत नव्हता. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी लवकरच एका मोठ्या योजनेची घोषणा करू शकतात. सूत्रांचे म्हणणे आहे की, पीएमओ व वित्त मंत्रालय मिळून एका मोठ्या योजनेवर काम करीत आहेत व ती लवकरच समोर येऊ शकते. याआधी सरकारने महिलांना जनधन, उज्ज्वला, आयुष्मान कार्ड, मोफत रेशन, पक्की घरे, इज्जत घर, हर घर नल अशा योजना दिल्या.
देशभरात महिला करणार पंतप्रधानांचे अभिनंदन
नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक संसदेत मंजूर केल्याबद्दल देशभरातील महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणार आहेत. शुक्रवारी दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपच्या महिला मोर्चाने अभिनंदन केले. शनिवारी वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला अभिनंदन करणार आहेत. महिलांना अधिकार देण्यासाठी पंतप्रधानांचे अभिनंदन आता देशातील प्रत्येक राज्यात होणार आहे. भाजपने प्रत्येक प्रदेश शाखेकडे अभिनंदन समारंभासाठी ठिकाणांची यादी मागितली आहे. यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार व तेलंगणासारख्या राज्यांचा समावेश आहे.