भारतीय सैनिकांच्या स्मृतिस्थळाला मोदी देणार भेट
By admin | Published: July 5, 2017 01:18 AM2017-07-05T01:18:06+5:302017-07-05T01:22:22+5:30
भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित झाल्याला २५ वर्षे पूर्ण होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित झाल्याला २५ वर्षे पूर्ण होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी इस्रायलला पोहोचले. त्यांच्या आजपासून सुरू झालेल्या दौऱ्यामध्ये ते तेथील भारतीय वंशाचे ज्यू बांधव, अनेक उद्योगांचे अध्यक्ष तसेच तेल अविव, जेरुसलेम या महत्त्वाच्या शहरांना भेट देणार आहेत.
त्याबरोबरच नरेंद्र मोदी हे हैफा या इस्रायलमधील प्राचीन शहरातील भारतीय सैनिकांच्या स्मृतिस्थळाला आणि स्मशानालाही ते भेट देतील. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश लष्करासाठी लढणाऱ्या भारतीय जवानाला इस्रायलमध्ये वीरगती प्राप्त झाली होती. १९२८ साली इस्रायलमध्ये बलिदान देणाऱ्या या जवानांच्या स्मृतीसाठी भारतीय लष्कर आजही २३ सप्टेंबर रोजी हैफा दिवस पाळते. हैफा लढाई १९१८ साली सुरू झाली. तिला २0१८मध्ये १00 वर्षे पूर्ण होतील. या लढाईच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच जोधपूर, म्हैसूर, हैदराबाद संस्थानातील जवानांनी केलेल्या कामगिरीची आठवण म्हणून १९२२ साली नवी दिल्लीमध्ये तीन मूर्ती हे स्मृतिस्थळ बांधण्यात आले. या रस्त्याचे नाव आता तीन मूर्ती हैफा मार्ग असे करण्यात येणार आहे.
जोधपूर आणि म्हैसूर आणि संस्थानांतील जवान असलेल्या ब्रिटिश लष्कराच्या १५व्या घोडदळाने २३ सप्टेंबर १९१८ रोजी तुर्की आॅटोमन आणि जर्मन फौजांवर आक्रमक हल्ला केला. आॅटोमन सैन्याकडे त्या वेळेस उत्तम मशिनगन्स होत्या. मात्र केवळ तलवारी आणि घोडेस्वारीच्या मदतीने भारतीय जवानांनी हैफाची आॅटोमन्सच्या तावडीतून मुक्तता केली. या अचाट युद्धकौशल्याचे कौतुक आजही जगभरामध्ये केले जाते.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी ‘आप का स्वागत है मेरे दोस्त’ असे हिंदी भाषेत मोदी यांचे स्वागत केले. नेत्यानाहू यांनी मोदी यांना तीन वेळा मिठी मारली.
काँग्रेसची टीका
नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीतून काहीही साध्य होणार नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान तीन वर्षांत ६४ वेळा परदेशांमध्ये गेले असून, त्यातून काय साध्य झाले, हे त्यांनी वा केंद्र सरकारने जाहीर करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन यांनी केली. ते म्हणाले की, परदेशांमध्ये भारतीयांसमोर भाषणे करून काहीही साध्य होत नाही, हे आता तरी लक्षात यायला हवे.