मोदींचे पाकमध्ये स्वागतच - हाफीज सईद
By Admin | Published: July 14, 2014 09:36 AM2014-07-14T09:36:36+5:302014-07-14T18:35:37+5:30
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु असे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदने म्हटले आहे.
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १४ - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु असे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईदने म्हटले असून दहशतवादी कारवायांशी माझा संबंध नाही असा दावाही त्याने केला आहे. दरम्यान, वैदिकी यांनी हाफिज सईदच्या घेतलेल्या भेटीवरून प्रचंड वादळ उठले आहे. मुंबई बाँबस्फोटांचा सुत्रधार असल्याचा ठपका असलेल्या सईदला भारतीय सरकारच्या संमतीशिवाय थेट पाकिस्तानात जाऊन वैदिकी यांना भेट कशी घेता येते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला असून वैदिकी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. विशेष म्हणजे मणीशंकर अय्यर प्रमुख असलेल्या शिष्टमंडळासोबत वैदिकी गेले होते, परंतु हे शिष्टमंडळ एका दिवसात भारतात परतले तर वैदिकी वैयक्तिक जबाबदारीवर काही आठवडे पाकिस्तानात राहिले व सईदला भेटले.
पाकिस्तानमध्ये जाऊन हाफीज सईदची भेट घेणारे वरिष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी भारतात परतल्यावर हाफीजशी झालेल्या चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. वैदिक म्हणाले, हाफीज सईदने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. तसेच त्याचा मोदींच्या पाकिस्तान दौ-यालाही विरोध नाही. लाहोरमध्ये कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात हाफीज राहत असून त्याचे घर वर्दळीच्या ठिकाणीच आहे असे वैदिक सांगतात. हाफीजने वैदिक यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान मुंबईत फिरण्याची इच्छाही व्यक्त केली. माझे आई-वडिल पाकिस्तानमध्ये येण्यापूर्वी पंजाबमध्ये राहायचे अशी आठवण त्याने सांगितल्याचे वैदिक यांनी नमूद केले. भारतात आल्यावर मला माझी बाजू आणखी योग्य रितीने मांडता येईल असेही हाफीज स्पष्ट केले.
वैदिक हे योगगुरु रामदेव बाबा यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. वैदिक यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन हाफीज सईदची भेट घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. पाक दौ-यावर मी पत्रकार या नात्याने गेलो होतो. पाकला जाताना हाफीज सईदशी मुलाखात होईल याची सूतराम कल्पना नव्हती. तिथे स्थानिक पत्रकाराने ही भेट घडवून आणल्याचा दावा वैदिक यांनी केला आहे. या दौ-यात वैदिक हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि अन्य नेत्यांचीही भेट घेतली.