दिल्लीने रोखला मोदींचा विजयी रथ
By admin | Published: February 10, 2015 11:06 AM2015-02-10T11:06:21+5:302015-02-10T11:06:33+5:30
दिमाखदार विजयानंतर नरेंद्र मोदी व भाजपाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर हरियाणा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दिमाखदार विजयानंतर नरेंद्र मोदी व भाजपाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली आहे. दिल्लीत अवघ्या तीन जागांवर भाजपा आघाडीवर असून ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवणेही भाजपासाठी कठीण झाले आहे.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळाल्यापासून भाजपाला देशभरात अच्छे दिन आले होते. २०१३ मध्ये झालेल्या दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले होते. या विजयामुळे देशभरात मोदी लहर असल्याचा दावा भाजपा नेते करत होते. मे २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने एकहाती सत्ता काबीज करत काँग्रेसला नेस्तनाबूत केले. लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्र व हरियाणा या राज्यांमधील विधानसभा निवडणूक पार पडल्या. यामध्येही भाजपाला बहुमत मिळवत सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपाच्या गोटात कमालीचा उत्साह संचारला होता.
आगामी काळात बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा इच्छूक आहे. त्यादृष्टीने दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची होती. उत्तर भारतात दिल्ली हे छोटे राज्य असले तरी या राज्यात विजय मिळवणे भाजपासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः दिल्लीत पाच प्रचार सभा घेतल्या. याशिवाय अमित शहा हेदेखील दिल्लीत जातीने लक्ष घालत होते. प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व खासदारांची फौजही दिल्लीच्या मैदानात उतरवण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नकारात्मक प्रचार करण्यावर भाजपाने भर दिला. मोदी विरुद्ध केजरीवाल अशी थेट लढत टाळण्यासाठी भाजपा नेतृत्वाने किरण बेदी यांना दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषीत केले. स्थानिक नेत्यांना डावलून बेदींना पुढे करण्याचा अमित शहांचा डाव पूर्णपणे फसल्याचे निकालावरुन दिसत आहे. दिल्लीत भाजपाला ३४ जागा मिळतील असा अंदाज भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणात वर्तवण्यात आला होता. मात्र भाजपा आता फक्त ३ जागांवरच आघाडीवर आहे. यावरुन भाजपा दिल्लीतील सद्यस्थितीवरुन किती अनभिज्ञ होता हेच दिसते.