सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदींचा ‘हट्ट’योग!
By admin | Published: June 1, 2015 04:49 AM2015-06-01T04:49:41+5:302015-06-01T04:49:41+5:30
दिल्लीतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता आॅफिस संपल्यावर लगेच घरी पळता येणार नाही. कारण सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर आपल्या
नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
दिल्लीतील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता आॅफिस संपल्यावर लगेच घरी पळता येणार नाही. कारण सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसह दररोज ४५ मिनिटांच्या योगवर्गाला हजर राहण्याचा फतवा मोदी सरकारने काढला आहे!
स्वत: पंतप्रधान मोदी यांच्याकडे मंत्री म्हणून कार्यभार असलेल्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) सर्व कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या ताज्या परिपत्रकानुसार दररोज कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यावर सायंकाळी सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये योगशिक्षणाचे वर्ग घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘डीओपीटी’चे संचालक एन. श्रीनिवासन या परिपत्रकात म्हणतात की, मोरारजी देसाई योग संस्थानचे प्रशिक्षक कार्यालय सुटल्यानंतर ब्लॉक १४च्या तळमजल्यावर १ जूनपासून रोज दोन तुकड्यांमध्ये योगाचे वर्ग घेतील. पहिली तुकडी सा. ५.३० ते ६.१५ व दुसरी सा. ६.१५ ते ७ वाजेपर्यंत भरेल.
याआधीही ‘डीओपीटी’ने २५ मेपासून जलेबी चौकात कर्मचाऱ्यांचे योगशिक्षण वर्ग घेण्याची सुरुवात केली असून, त्यासाठीही सहकुटुंब
हजर राहण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. २१ जून रोजीच्या ‘जागतिक योग दिना’साठी ही
सर्व तयारी सुरू असल्याचे
कळते. त्या दिवशी नवी दिल्लीतील रस्त्यांवर व सार्वजनिक उद्यानांमध्ये हजारो नागरिकांनी एकाच
वेळी योगासने करावीत, अशी सरकारची योजना आहे. त्यासाठी अपल्या कर्मचाऱ्यांची तयारी करून घेण्याची मोदी सरकारने अशी सुरुवात केली आहे.