मोहम्मद जैद हुसेनने संस्कृत विषयात मिळवले शंभर पैकी 100 गुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 16:06 IST2020-07-18T16:05:14+5:302020-07-18T16:06:44+5:30
शिक्षकांच्या शिकविण्याची पद्धत आणि स्वभावामुळेच जैदला संस्कृत विषयात कमालीची आवड निर्माण झाली

मोहम्मद जैद हुसेनने संस्कृत विषयात मिळवले शंभर पैकी 100 गुण
नवी दिल्ली - ग्रेटर नोएडा येथील दिल्ली पब्लिक स्कुलमधील विद्यार्थी मोहम्मद जैद हसन याने 10 वीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षेत इतिहास रचला आहे. जैदने संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. बुधवार 15 जुलै रोजी सीबीएससी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, जैदने मिळवलेल्या संस्कृत विषयातील गुणांमुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. तर, जैदच्या आई-वडिलांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिक्षकांच्या शिकविण्याची पद्धत आणि स्वभावामुळेच जैदला संस्कृत विषयात कमालीची आवड निर्माण झाली, त्यामुळेच त्याने संस्कृतचे शिक्षक सुधाकर मिश्र यांच्या मार्गदर्शनात संस्कृतचे धडे गिरवले. म्हणूनच, आपल्या दहावीच्या परीक्षेतील यशाचे श्रेयही जैदने आपले शिक्षक सुधाकर मिश्र यांनाच दिले आहे. विशेष म्हणजे जैदचे आई-वडिल हे डॉक्टर आहेत. जैदच्या कुटुंबात शिक्षण आणि सामाजिकतेचंही वातावरण आहे. त्यामुळेच, शिक्षणाचं बाळकडून त्याला घरातूनच मिळालं, तर आई-वडिलांकडूनच प्रोत्साहनही मिळत. विशेष म्हणजे जैदच्या मोठ्या भावानेही संस्कृत विषयातच आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
भावाच्या संस्कृत विषयातील शिक्षणाचाही जैदला मार्गदर्शनासाठी आणि विषयाच्या समजुतीसाठी चांगला फायदा झाल्याचे जैदने म्हटले. संस्कृतसोबतच, इंग्रजी, उर्दू, हिंदी आणि अरबी भाषेतवरही जैदची पकड आहे. या चारही भाषांमध्ये लिखाण आणि संवाद सहजपणे करण्याची कला त्याच्याकडे आहे. इयत्ता चौथीपासूनच आपण संस्कृत विषयाचा अभ्यास सुरु केला होता. आता, दहावीनंतर आयआयटीची तयारी करणार आहे, पण संस्कृत विषयातच शिक्षण सुरू ठेवणार असल्याचेही जैदने म्हटले.