'रामनवमीला दंगल घडविण्यासाठी मोहन भागवतांकडून बिहारमधील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 03:13 PM2018-03-30T15:13:12+5:302018-03-30T15:53:24+5:30
या 14 दिवसांमध्ये त्यांनी येथील कार्यकर्त्यांना दंगल कशी भडकावयची, याचे रीतसर प्रशिक्षण दिले.
पाटणा: सरसंघचालक मोहन भागवत यांनी रामनवमीच्या दिवशी बिहारमध्ये दंगल घडवण्याचा कट आखला होता, असा गंभीर आरोप लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव यांनी केला. ते शुक्रवारी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी तेजस्वी यांनी म्हटले की, मोहन भागवत नुकतेच 14 दिवसांसाठी बिहारमध्ये येऊन गेले. या 14 दिवसांमध्ये त्यांनी येथील कार्यकर्त्यांना दंगल कशी भडकावयची, याचे रीतसर प्रशिक्षण दिले. त्यांना रामनवमीच्या काळात बिहारमध्ये दंगल घडवून आणायची होती, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये धार्मिक तंट्यांमुळे तणावाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे रामनवमीनंतरच या घटना घडल्या होत्या. त्यामुळे भागलपूर, औरंगाबाद, नालंदा आणि समस्तीपुर आणि नवादा जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. आज सकाळीच नवादा येथे हिंसक आंदोलन झाल्याचे समजते.
नवादा परिसरातील गोंदापूर चौकात एका धार्मिक स्थळाची तोडफोड झाल्यावरून हा वाद पेटला होता. या घटनेनंतर संबंधित समुदायाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून आक्रमक निदर्शने केली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. तर औरंगाबाद येथे पोलिसांवर दगडफेक झाली. तेथेदेखील पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केल्याचे समजते.
बिहारमधील वातावरण बिघडवण्यासाठी काहीजणांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले होते.
Mohan Bhagwat recently came to Bihar for 14 days. In these 14 days, he gave training on how to incite riots during #RamNavami. Now people are getting to know about the agenda of his Bihar visit: Tejashwi Yadav, RJD on incidents of communal violence in #Biharpic.twitter.com/bLfYxwIiIb
— ANI (@ANI) March 30, 2018