"मोहन भागवतांना हे बोलण्याचा अधिकार नाही"; मंदिर-मशीद मुद्द्यावरून रामभद्राचार्य भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 17:41 IST2024-12-25T17:38:41+5:302024-12-25T17:41:33+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावर स्वामी रामभद्राचार्यांनी संताप व्यक्त केला. मंदिर-मशीद वादावर त्यांनी भूमिका मांडली.

"मोहन भागवतांना हे बोलण्याचा अधिकार नाही"; मंदिर-मशीद मुद्द्यावरून रामभद्राचार्य भडकले
Swami Rambhadracharya on Mohan Bhagwat Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाची देशभरात चर्चा सुरू आहे. त्यांच्या विधानाला विरोधही होत आहे. तुलसी पिठाधीश्वेर स्वामी रामभद्राचार्य यांनी तर 'मोहन भागवत यांना असे बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
धर्माची व्याख्या सांगणारे ते कोण आहेत?
स्वामी रामभद्राचार्य यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "माझा सर्वात जास्त आक्षेप या गोष्टीवर आहे की, त्यांना हे बोलण्याचा अधिकारी नाही की, आता मंदिर-मशीद सगळं सोडून द्यायला. आम्ही शोधत नाहीये. जिथे जिथे आमच्या मंदिरांचे पुरावे आहेत, आम्हाला तेच हवे आहेत. दुसरा आक्षेप म्हणजे त्यांनी (मोहन भागवत) असं म्हटलं की, राम मंदिर निर्माणानंतर काही लोक असे मुद्दे उपस्थित करून पुढारी होऊ इच्छित आहे. कोणाला पुढारी व्हायचे आहे?", असा सवाल स्वामी रामभद्राचार्य यांनी केला.
"माझा तिसरा आक्षेप हा आहे की, त्यांनी (मोहन भागवत) नाशिकमध्ये असे म्हटले की, धर्माची चुकीची व्याख्या केली जात आहे. नीट अर्थ सांगितला जात नाहीये. आम्हाला धर्माची व्याख्या सांगणारे, ते कोण आहेत? धर्माचार्य आम्ही आहोत, जगतगुरू आम्ही आहोत. आमच्यापेक्षा जास्त धर्म त्यांना थोडी माहिती आहे. त्यांनी अशी विधाने करायला नको. ते एका संघटनेचे प्रमुख आहेत. हिंदू धर्माचे ते प्रमुख नाहीत. त्यांच्या म्हणण्यांनुसार हिंदू धर्म चालणार नाही", असे भाष्य स्वामी रामभद्राचार्य यांनी केले.
"धर्माचार्यांना बोलवून चर्चा करायला हवी होती"
"त्यांनी (मोहन भागवत) आधी संत, धर्माचार्य यांना बोलवायला हवे होते. त्यांनी त्यांची चिंता मांडली असती, तर आम्ही धर्माचार्यांनी त्यांचे समाधान केले असते. आम्हाला निर्देश देणारे ते कोण आहेत? आम्हाला त्यांच्या मशिदी नकोय. जिथे जिथे पुरावे आहेत, ते आम्हाला हवे आहे. इतिहासाला आम्ही सोडणार नाही. अधिकार गमावून बसणे या सगळ्यात मोठे दुर्दैव आहे. आपल्या भावालाही दंड देणे हाच धर्म आहे", असे स्वामी रामभद्राचार्य म्हणाले.
मंदिर-मशीद वादावर बोलताना स्वामी रामभद्राचार्य म्हणाले, "सर्व्हेमध्ये जिथे जिथे आमची मंदिरं आहेत, तिथे तिथे आम्हाला अधिकार हवा आहे. आम्ही त्यांच्या मशिदी कधीही तोडल्या नाहीत. त्यांनी आमची तीस हजार मंदिरं तोडली आहेत, मग कमीत कमी सर्व्हेमध्ये जिथे मुख्य मंदिरं आढळत आहेत, ते तर आम्हाला मिळायला हवेत. आम्हाला यापलिकडे काहीही नकोय. भागवतजींना असा म्हणण्याचा अधिकार नाहीये की, लोक नेता बनण्याचे प्रयत्न करताहेत. आम्हाला नेता बनायचे नाही. आम्ही केवळ अधिकारांची लढाई लढतोय", अशी भूमिका त्यांनी मांडली.