मोहन भागवत तर राष्ट्रपिता; भेटीनंतर इमाम संघटनेच्या प्रमुखांकडून RSS प्रमुखांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 06:09 PM2022-09-22T18:09:21+5:302022-09-22T18:09:32+5:30
जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी RSS प्रमुखांनी अनेक मुस्लिम विचारवंतांच्या भेटी घेतल्या.
नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bahgwat) यांची भेट घेतल्यानंतर अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांनी भागवतांचे 'राष्ट्रपिता' आणि 'राष्ट्राचे ऋषी' असे वर्णन केले आहे. मोहन भागवत यांनी गुरुवारी दिल्लीतील मशिदीत उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली, यानंतर इलियासी यांनी त्यांना राष्ट्रपती म्हटले. इलियासी म्हणाले- 'आम्ही सर्व मानतो की राष्ट्र सर्वोपरी आहे. आमचा डीएनए एक आहे, फक्त अल्लाहची उपासना करण्याची पद्धत वेगळी आहे.'
मोहन भागवत आणि इलियासी यांनी कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत तासाभराहून अधिक काळ बंद दाराआड बैठक घेतली. भारतीय इमाम संघटनेचे कार्यालय येथेच आहे. भागवत यांच्यासोबत संघाचे वरिष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि इंद्रेश कुमार होते. राम लाल हे यापूर्वी भाजपचे संघटनात्मक सचिव होते तर कुमार हे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक आहेत. या भेटीची माहिती देताना उमर अहमद इलियासी यांचे भाऊ सुहैब इलियासी म्हणाले, 'आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आमच्या निमंत्रणावर भागवत आले. यातूनही देशात चांगला संदेश गेला आहे.'
मुस्लिम विचारवंतांचीही भेट घेतली
आरएसएस प्रमुख मोहन भागवत देशातील जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी मुस्लिम विचारवंतांशी चर्चा करत आहेत. अलीकडेच त्यांनी दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी, अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि उद्योगपती सईद शेरवानी यांची भेट घेतली होती.
'काफिर' ते 'जिहादी'वर चर्चा
या बैठकीत भागवत यांनी हिंदूंसाठी 'काफिर' हा शब्द वापरल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यामुळे चांगला संदेश जात नसल्याचे म्हटले होते. त्याच वेळी मुस्लिम विचारवंतांनी काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी मुस्लिमांना जिहादी आणि पाकिस्तानी म्हणण्यावर आक्षेप घेतला होता. मुस्लीम विचारवंतांनी भागवतांना असेही सांगितले की, काफिर या शब्दाच्या वापरामागील हेतू काही वेगळाच आहे, परंतु काहीजण त्याचा अपमानास्पद शब्द म्हणून वापर करत आहेत. विचारवंतांची चिंता समजून घेत आरएसएस प्रमुख सर्व हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असल्याचे म्हटले.