“आम्हाला कोणाचेही धर्मांतर करायचे नाही, तर चांगला माणूस घडवायचाय”: मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 10:44 AM2021-11-20T10:44:24+5:302021-11-20T10:45:10+5:30
आपल्याला भारताला आणखी समृद्ध बनवायचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
रायपूर: आम्हाला कोणाचाही धर्म बदलायचा नाही, तर माणसाला समृद्ध जीवन जगण्याची पद्धत शिकवायची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले आहे. छत्तीसगड येथे आयोजित करण्यात आलेल्या घोष शिबिरात ते बोलत होते.
आपल्याला कोणाचे धर्मांतर करायचे नाही, तर कसे जगायचे हे शिकवायचे आहे. आपण भारतभूमीत जन्मलो आहोत आणि आमचा पंथ कोणाचीही उपासना पद्धत न बदलता चांगला माणूस घडवू शकतो, अशी शिकवण आपल्याला संपूर्ण जगाला करून द्यायची आहे, असे मोहन भागवत यांनी यावेळी बोलतना नमूद केले.
विश्वगुरू बनण्यासाठी समन्वयाने पुढे जाण्याची गरज
भारताला विश्वगुरू बनवायचे असेल, तर सर्वांना सोबत घेऊन समन्वयाने पुढे जाण्याची गरज आहे. आपल्याला भारताला आणखी समृद्ध बनवायचे आहे. देशाची व्यवस्था कोणी बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती चांगली बाब नाही. या परिस्थितीत काय करायचे, हे देशाने ठरवायचे आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. आपल्यासाठी संपूर्ण जग हे एका कुटुंबासारखे आहे. आपल्या व्यवहाराने वागण्याने हे सत्य जगाला पटवून दिले पाहिजे. माणसामध्ये असलेल्या गुणांमुळे त्याचा विकास होतो आणि त्या गुणांचा विकास कसा केला जातो, हे जगाला माहिती आहे. ही बाब समजून घेण्याची गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
हाच आपला धर्म आहे
पूजा-उपासना पद्धती, जातपात, भाषा यांमध्ये विविधता असूनही आपलेपणाची वागणूक ही सर्वांना एकजुटीने मिळून-मिसळून राहण्याची शिकवण देते. यामुळे आपण कोणालाही परकेपणाची वागणूक देत नाही. हीच आपल्या धर्माची शिकवण आहे, हाच आपला धर्म आहे. या माध्यमातून लोकांना समृद्ध जीवन जगण्याची पद्धत शिकवली जाऊ शकते. हरवलेले व्यवहारिक संतुलन परत मिळवता येऊ शकते, असे मोहन भागवत यांनी यावेळी सांगितले.