मोहरम ताजियाला परवानगी नाही; सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 02:11 AM2020-08-28T02:11:56+5:302020-08-28T02:12:06+5:30
राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय संपूर्ण देशात लागू होणारा कुठलाही आदेश कसा देता येईल? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलाला विचारला.
नवी दिल्ली : पुरीत रथयात्रा काढण्याची परवानगी देण्यात आली. पर्युषण पर्वानिमित्त जैन समुदायातील बांधवांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली. त्याच धर्तीवर मोहरम ताजियाला परवानगी द्यावी, यासाठी केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
शिया धर्मगुरू कल्बे जव्वाद यांनी ही याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमक्ष याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. संपूर्ण काळजी घेत, नियमांचे पालन करीत मोहरम ताजियाला परवानगी देण्यात यावी, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलाकडून करण्यात आला. कोरोनाचे सावट असल्याने या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. संपूर्ण देशाला लागू असलेल्या आदेशाला फाटा देता धार्मिक कार्यक्रमासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय संपूर्ण देशात लागू होणारा कुठलाही आदेश कसा देता येईल? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलाला विचारला.
हायकोर्टात जा
लखनौमध्ये शिया समुदायाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. न्यायालयाने या शहरात मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती यादरम्यान करण्यात आली; परंतु खंडपीठाने यासंबंधी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.