मोईत्रा यांनी जैन समाजाची माफी मागावी - आचार्य लोकेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 12:59 PM2022-02-06T12:59:18+5:302022-02-06T13:00:52+5:30
जैन समाज अहिंसक, शांतीप्रिय : यावेळी आचार्य लोकेशजी यांच्या नेतृत्वात भेट घेण्यासाठी आलेल्या जैन समाजाच्या शिष्टमंडळाला केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी संबोधित केले.
नवी दिल्ली : विश्व शांतीदूत जैन आचार्य लोकेशजी यांच्या नेतृत्वात जैन शिष्टमंडळाने केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची भेट घेतली. या भेटीत आचार्य लोकेशजी यांनी खा. महुआ मोईत्रा यांच्या जैन समाजाबद्दलच्या अपमानास्पद वक्तव्याचा विरोध केला. मोईत्रा यांनी सदनात उभे राहून जैन समाजाची माफी मागावी व त्यांनी केलेले अपमानास्पद वक्तव्य संसदेच्या रेकॉर्डमधून गाळण्यात यावे, अशी मागणी केली. शिष्टमंडळात संपूर्ण जैन समाजाच्या वतीने ज्येष्ठ नेते मनोज जैन, जसवंत जैन उपस्थित होते. अशा तऱ्हेचे अभद्र व वाचाळ वक्तव्य संसदेच्या आचरणाला खंडित करणारे असून, आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याची भावना आचार्य लोकेशजी यांनी व्यक्त केली. सदनातील पटलावर अपमानजनक वक्तव्य करण्यापूर्वी मोईत्रा यांनी भारतीय संस्कृती, विशेषत्वाने जैन समाजाच्या भोजन संस्कारांवर थोडासा तरी अभ्यास करणे अपेक्षित होते.
जैन समाज हा शाकाहारी समाज असल्याचे संपूर्ण जगात ओळखले जाते. शाकाहारी असणे ही जैन समाजाची ओळख आहे आणि समाजासाठी ती गौरवाची बाब आहे. जैन युवकांनी मांसाहार करण्याचे निंदनीय वक्तव्य करून महुआ मोईत्रा यांनी जैन समाजाच्या नैतिकतेवर हल्ला चढवला आहे. ही घटना जैन समाजाच्या भावना, विचार आणि मूल्यांना खंडित करणारी असून, ते सहन केले जाऊ शकत नाही. जैन समाजाला आपल्या क्षुद्र राजकारणात ओढण्याचे प्रयत्न करू नका, असा इशारा अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक जैन आचार्य डॉ. लोकेशजी यांनी या प्रकरणावर बोलताना दिला.
जैन समाज अहिंसक, शांतीप्रिय : यावेळी आचार्य लोकेशजी यांच्या नेतृत्वात भेट घेण्यासाठी आलेल्या जैन समाजाच्या शिष्टमंडळाला केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी संबोधित केले. जैन समाज अहिंसक, शांतीप्रिय असून समाज व राष्ट्र निर्माणात मोठे व महत्त्वाचे योगदान देणारा समाज आहे. देशावर जेव्हाही संकट आले तेव्हा जैन समाजाने अग्रणी भूमिका निभावली आहे. जैन समाजाची पॉलिटिकल लिचिंग कधीच स्वीकार केली जाणार नाही. मी लोकसभेच्या अध्यक्षांकडे आणि संसदेत हा विषय प्रकर्षाने उचलणार असल्याचे आश्वासन नकवी यांनी यावेळी दिले.