Viral : या मातेच्या विचारांना 'वंदन', 60 टक्के मिळवणाऱ्या मुलाचं आईकडून 'भरभरून कौतुक'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 01:29 PM2019-05-09T13:29:57+5:302019-05-09T13:39:30+5:30
डिजिटल इंडियातील स्पर्धेच्या युगात सगळीकडेच स्पर्धा पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली - सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं प्रमाण जवळपास पाच टक्क्यांनी वाढलं आहे. गेल्या वर्षी 86.07 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा हे प्रमाण 91.1 टक्क्यांवर गेलं आहे. या निकालात राजस्थानच्या तारू जैन हिने 500 पैकी 499 मार्क मिळवत पहिला क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे 13 विद्यार्थ्यांनी 499 मार्क मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. मात्र, एका 60 टक्के मिळवणाऱ्या मुलीचंही मोठं कौतुक होत आहे.
डिजिटल इंडियातील स्पर्धेच्या युगात सगळीकडेच स्पर्धा पाहायला मिळत आहे. मग, नोकरीसाठी असो किंवा उद्योगधंद्यांसाठी, अॅडमिशनसाठी असो किंवा स्कॉलरशीप मिळविण्यासाठी, जिथे तिथे स्पर्धाच स्पर्धा. स्पर्धेच्या या युगात दहावी आणि बारावीच्या परीक्षाही मागे नाहीत. त्यामुळेच, कधी काळी 60 टक्क्यांवर समाधान मानणारे पालक आज मुलांच्या 90 टक्के गुणांवरही तितकेसे आनंदी होत नाहीत. मात्र, दिल्लीतील एक आई यास अपवाद ठरली आहे. आपल्या एका हलक्याशा कृतीतून वंदना कटोच यांनी फेसबुकवरुन लाखो लोकांनी मने जिंकली आहेत. कारण, वंदना यांनी 60 टक्के गुण मिळविणाऱ्या आपल्या मुलाचे तोंडभरुन कौतुक या फेसबुक पोस्टमध्ये केले आहे.
''मला तुझा खूप अभिमान आहे, हे गुण 90 टक्के नाहीत. पण, मला झालेला आनंद ते 90 टक्के गुणही बदलू शकत नाहीत. मी माझ्या मुलाची धडपड पाहिली आहे, प्रत्येक विषय समजून घेताना आणि सोडवताना त्याची मेहनतही मी जवळून पाहिली आहे. शेवटच्या दीड महिन्यात परीक्षेसाठी त्याने जीव ओतून कष्ट घेतले. आमेर तुला आणि तुझ्यासारख्या मुलांना मी एवढच सांगू इच्छिते की, मासे झाडावर चढू शकत नाहीत. आपला रस्ता निवडणे अवघड आहे, माझ्या मुला हे एक मोठा समुद्र आहे. त्यामुळे, स्वत:मधील चांगुलपणा, समजदारी आणि धडपड कायम सोबत ठेव. त्यासोबतच तुझा भन्नाट सेंस ऑफ ह्युमरही जप.''
अशी फेसबुक पोस्ट या माऊलीने लिहिले आहे. या फेसबुक पोस्टला 9.7 हजार लाईक्स तर 5.6 हजार शेअर्स मिळाले आहेत. तसेच, हजार कमेंटने या फेसबुक पोस्टचे कौतुकही केले आहे. सध्या, ही फेसबुक पोस्ट बातम्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यंदा सीबीएसईचा निकाल 91.1 टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये 4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुण्याचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाने 99 टक्के अशा विक्रमी निकालाची नोंद केली आहे. 90 पेक्षा जास्त टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना आनंदाचा धक्का बसला आहे. सीबीएसई दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल दरम्यान पार पडली होती. देशभरातून 17 लाख 61 हजार 78 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 16 लाख 4 हजार 428 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील 13 विद्यार्थ्यांनी परीक्षेत 500 पैकी 499 गुण घेऊन संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला आहे. दहावीच्या सीबीएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. या निकालात तब्बल 99.8 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटाकवला.