डहाणूच्या युवकाचा ‘इसिस’ला पैसा, दुबईमध्ये बसून उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:38 AM2017-10-02T02:38:26+5:302017-10-02T02:38:48+5:30
मूळचा मुंबईजवळील डहाणूचा असलेल्या अबू नबिल (खरे नाव जमिल) या दुबईत नोकरी करणाºया युवकाने भारतातून गोळा केलेली सुमारे ४० लाख रुपयांची रक्कम, ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेस
नवी दिल्ली: मूळचा मुंबईजवळील डहाणूचा असलेल्या अबू नबिल (खरे नाव जमिल) या दुबईत नोकरी करणाºया युवकाने भारतातून गोळा केलेली सुमारे ४० लाख रुपयांची रक्कम, ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेस इराक आणि सीरियामध्ये पोहोचविल्याचे उघड झाले आहे.
‘इसिस’च्या प्रचाराने डोके भडकलेले अनेक भारतीय तरुण त्यांच्यासाठी लढण्यासाठी गेल्याचे या आधीच उघड झाले आहे. अशा काही तरुणांना त्या वाटेने जात असताना पकडले गेले, परंतु अबू नबिलसंबंधीच्या या तपासाने ‘इसिस’ला भारतातून मोठा वित्तपुरवठाही झाल्याचे संकेत मिळत आहेत.
एमबीए असलेला अबू नबिल दुबईत महिना ३.५ लाख रुपये पगाराची नोकरी करत होता. तेथे बसून त्याने भारतातील मुस्लिमांकडून ‘जकात’ची रक्कम गोळा केली व ती पैसे हस्तांतरणाच्या अधिकृत मार्गांचा अवलंब करून, ‘इसिस’साठी लढणाºयांना राक्का आणि अन्बार प्रांतात पोहोचविण्याची व्यवस्था केली.
यासाठी अबू नबिलने साराजेवो, बैरुत आणि इस्तंबुल येथील लोकांचा पैसे पोहोचविण्यासाठी दूत म्हणून वापर केला, असेही समोर आले आहे.
‘बिस्ट आॅफ इस्लाम’
अबू नबिलने हे पैसे ‘बिस्ट आॅफ इस्लाम’च्या नावाने पाठविल्याचे दिसते. मूळ कॅनडाचा नागरिक असलेल्या फराह मोहम्मद शिरडोनला दिलेले हे सांकेतिक नाव होते. ‘इसिस’चा प्रमुख अबु बकर अल बगदादी याने याच शिरडोनचे अबू उसामा अल सोमाली असे नामकरण केले होते. ‘इसिस’साठी माणसे व पैसे
गोळा करणारा बगदादीचा प्रमुख हस्तक म्हणून तो ओळखला जातो.