पैसे कापले, पण तिकिट नाही मिळाले; IRCTC च्या समस्यांनी प्रवासी त्रासले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 07:54 AM2021-01-11T07:54:45+5:302021-01-11T07:56:48+5:30
IRCTC new Portal: हजारो प्रवासी याबाबत तक्रार करत आहेत. वेबसाईटवरून ट्रेन किंवा विमानाचे तिकिट काढत असताना वॉलेट किंवा अन्य दुसऱ्या पेमेंट मोडद्वारे पैसे कापले जातात, मात्र तिकिट काही मिळत नाही, असा त्यांना वाईट अनुभव येत आहे.
लखनऊ : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) च्या पोर्टलवर तिकिट काढणारे प्रवासी सध्या वेगळ्याच समस्येने त्रस्त आहेत. वेगाने तिकिट आरक्षित करण्यासाठी ही वेबसाईट गेल्याच आठवड्यात लाँच झाली आहे. मात्र, तिकिट काढतेवेळी ट्रान्झेक्शन इन्कप्लिट असा मेसेज दाखवत बँक खात्यातून मात्र पैसे वजा झाल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.
एवढेच नाही तर आयआरसीटीसीच्या (IRCTC) वॉलेटमध्ये देखील एकही रुपया अपलोड होत नाहीय. दुसरीकडे रेल्वेचे अधिकारी या गोष्टी फेटाळून लावताना अशाप्रकारची कोणतीही समस्या रेल्वेच्या पोर्टलमध्ये नसल्याचे सांगत आहेत.
हजारो प्रवासी याबाबत तक्रार करत आहेत. वेबसाईटवरून ट्रेन किंवा विमानाचे तिकिट काढत असताना वॉलेट किंवा अन्य दुसऱ्या पेमेंट मोडद्वारे पैसे कापले जातात, मात्र तिकिट काही मिळत नाही, असा त्यांना वाईट अनुभव येत आहे. या लोकांना आरक्षण केंद्रावर जाऊन तिकिट आरक्षित करावे लागत आहे. एवढेच नाही कापलेले पैसे देखील दोन दोन आठवड्यांनी अकाऊंटमध्ये जमा केले जात आहेत. आयआरसीटीसीच्या त्रासाला वैतागून या लोकांना एजंटांकडे जावे लागत आहे. तत्काळ तिकिटासाठी रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर जावे लागत आहे.
जनरल तिकिटासाठीही आरक्षण
ट्रेनमध्ये पूर्वी जनरल क्लासमधून प्रवास करताना प्रवाशांना आरक्षणाची गरज भासत नव्हती. मात्र, कोरोनामुळे आता प्रत्येक प्रवाशाला आरक्षण केल्यानंतरच ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जात आहे. यासाठी देखील आयआरसीटीसीच्या पोर्टलवरून तिकिट बनविण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे.
याबाबत आयआरसीटीसीचे पीआरओ आनंद कुमार झा यांनी सांगितले की, पोर्टलमध्ये कोणतीही समस्या नाहीय. जर कोणत्याही प्रवाशाचे एक तिकिट काढतेवेळी एकापेक्षा जास्त वेळा पैसे कापले गेले असतील तर त्याला लवकरात लवकर रिफंड दिला जाईल.
रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुक करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आता रेल्वेचं तिकीट बुकिंग करणं अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेने अजून एक पाऊल टाकले आहे. याबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, IRCTC चे संकेतस्थळ आणि अॅप अपग्रेड झाल्यानंतर प्रवाशांना आधीच्या तुलनेत अधिक वेगाना तिकीट बुक करता येतील. नव्या वेबसाइटवर अधिक लोड पडला तरी ती हँग होणार नाही, असेही IRCTC कडून सांगण्यात आले. नव्या वेबसाइटमध्ये आधीच्या तुलनेत अधिक अॅडही दिसतील. त्यामुळे IRCTC ला अधिकचा महसूल मिळू शकेल. तिकीट बुकिंगसह जर तुम्हाला जेवण बुक करायचे असल्यास तुम्हाला सहजपणे पर्याय उपलब्ध होतील.