'केंद्राने आंध्र प्रदेशला जितके पैसे दिलेत, त्यापेक्षा जास्त तर बाहुबलीने कमावलेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 12:44 PM2018-02-08T12:44:48+5:302018-02-08T12:58:03+5:30
'आंध्र प्रदेशला मिळालेली रक्कम बाहुबलीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षाही कमी आहे', अशी खोचक टीका टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी केली आहे
हैदराबाद - आंध्र प्रदेशला निधी मिळण्यावरुन केंद्र आणि तेलगू देसम पार्टीत सुरु असलेल्या वादाने आता फिल्मी टर्न घेतला आहे. टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी बुधवारी भाजपाला चेतावणी दिली आहे की, सरकार आणि अर्थमंत्र्यांनी आंध्र प्रदेशला दिलेली सर्व आश्वासन पुर्ण करण्याची मागणी आम्ही करतो, अन्यथा भाजपासोबतच्या संबंधांवर पुर्निविचार करण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे नसेल. जयदेव गल्ला पुढे बोललेत की, 'आंध्र प्रदेशला मिळालेली रक्कम बाहुबलीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षाही कमी आहे'. 'बाहुबली 2- द कन्क्लूजन' चित्रपटाने भारत आणि जगभरात 1700 कोटींची कमाई केली होती. लोकसभेत जयदेव गल्ला यांनी खोचक टीका करताना, आंध्र प्रदेशचं बजेट बाहुबलीच्या एकूण कमाईपेक्षाही कमी असल्याचं म्हटलं. यानंतर टीडीपी सदस्यांनी सभागृहातून वॉक-आऊट केला.
2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत जयदेव गल्ला बोलले की, 'सरकारकडे शेवटची संधी आहे. भाजपाने युतीच धर्म निभावला पाहिजे'. आंध्र प्रदेशला देण्यात आलेली आश्वासनं पुर्ण झाली पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या संयमाची परिक्षा घेऊ नका असा इशाराही त्यांनी दिला. 'जर आश्वासनं पुर्ण झाली नाहीत तर येणा-या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. यामुळे इतर सहकारी पक्षांमध्ये चुकीचा संदेश जाईल. यामुळे सहयोगी पक्षांना आपल्याला फसवल्यासारखं वाटेल', असं ते बोलले आहेत.
जयदेव गल्ला यांनी म्हटलं आहे की, 'राजधानी अमरावती, पोलावरम, राज्याला विशेष पॅकेज आणि रेल्वे झोनसंबंधी बजेटमध्ये कोणताही उल्लेख नाहीये. जर भाजपा विचार करत असेल की निवडणुकीआधी युती तुटल्यानंतर आपण अधित मजबूत होऊ आणि टीडीपीची नाजूक स्थिती करु तर त्यांनी काँग्रेसची परिस्थिती पहायला हवी ज्यांचा आंध्र प्रदेशात एकही आमदार आणि खासदार नाही'. 'आंध्र प्रदेशच्या विभाजनावरुन काँग्रेसने केलेल्या चुकांमुळेच तेलंगणसोबत दोन राज्यांमधून त्यांचा पत्ता कट झाला आहे. आंध्र प्रदेशच्या जनतेला मुर्ख बनवलं जाऊ शकत नाही', असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी अरुण जेटलींकडे तात्काळ निधी जाहीर करण्याची मागणी केली आहे.