मनी लाँड्रिंगचे प्रकरण : मांस निर्यातदार मोईन कुरेशी याला ‘ईडी’ने केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:56 PM2017-08-26T23:56:03+5:302017-08-26T23:56:43+5:30
वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशी याला अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ३१ आॅगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली : वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशी याला अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ३१ आॅगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कुरेशी याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांत त्याची यापूर्वी अनेकदा चौकशी झाली आहे. त्याच्या विरोधातील एक गुन्हा यावर्षीच नोंदविण्यात आला आहे. सीबीआयचे माजी संचालक ए. पी. सिंग हेही या प्रकरणात सहआरोपी आहेत. याआधीचा गुन्हा २0१५ मधील आहे. आयकर विभागाच्या तक्रारीनंतर तो नोंदविण्यात आला होता.
करचोरी, मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचार अशा अनेक गुन्ह्यांत कुरेशी याचा सहभाग असल्याचा आरोप असून, प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयकडूनही त्याची चौकशी सुरू आहे. कुरेशी आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालकीच्या काही विदेशी मालमत्तांच्या संदर्भात ही चौकशी केली जात आहे.
हवालातून पैसेवाटप
सरकारी अधिका-यांना व लोकसेवकांना लाच देण्यासाठी पॅरिस आणि ब्रिटन यांसारख्या विदेशी स्थानांवरून हवालाचा वापर करण्यात आला. हैदराबादमधील एका व्यावसायिकास मदत करण्याच्या बदल्यात हवालामार्फत कोट्यवधी रुपये कुरेशीने उकळले. त्याच्या माध्यमातून दुबई, पॅरिस, अमेरिका, हाँगकाँग, इटाली व स्वीत्झरलँड या देशांत पैसा हस्तांतरित करण्यात आला.