माल्याने भारत सोडण्याआधीच ब्रिटीश कंपन्या आणि बँकांमध्ये वळवला पैसा
By admin | Published: April 22, 2017 08:00 AM2017-04-22T08:00:45+5:302017-04-22T11:08:10+5:30
विजय माल्या यांनी ब्रिटीश कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करणं सोपं जाणार आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - बँकांचे हजारो कोटींचे कर्ज घेऊन पसार झालेल्या कर्जबुडव्या विजय माल्या यांना भारतात परत आणण्याची चांगली संधी आपल्याकडे आहे असा विश्वास तपास अधिकारी व्यक्त करत आहेत. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ब्रिटीश सरकारसोबत काही कागदपत्रं शेअर केली आहेत, ज्यानुसार माल्या यांनी काळा पैसा सफेद करण्यासाठी भारतीय बँकांमधून ब्रिटीश कंपन्या आणि ब्रिटीश बँकांमधील खात्यांमध्ये गुंतवणूक केली आहे
.
सक्तवसुली संचलनालयाने तपासातील सर्व माहिती ब्रिटीश सरकासोबत शेअर केली आहे. सीबीआयने याआधीच माल्या यांच्यावर गुन्हेगारी कट रचणे आणि फसवणूक करण्याचा आरोप केला असून ईडीच्या माहितीमुळे दावा बळकट झाला आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार माल्या यांनी ब्रिटीश कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये गुंतवणूक केली असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करणं सोपं जाणार आहे. ही गोष्ट माल्यांच्या विरोधात जाईल अशी अपेक्षा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माल्या यांनी 2 मार्च रोजी लंडनला निघून जाण्याआधीच हे सर्व व्यवहार केले आहेत. माल्या यांनी खूप सारा पैसा ब्रिटनधील कंपन्या आणि बँक खात्यांमध्ये वळता केला होता. याशिवाय केमॅन आयलँड, मॉरिशिअस आणि इतर देशांमध्येही त्याने गुंतवणूक केली आहे.
ब्रिटनमध्ये पैशांची अफरातफर केल्याचं सिद्ध झाल्यास कायद्यात शिक्षेसाठी कडक तरतुदी आहेत. त्यादृष्टीने भारताला कारवाई करणं सोपं होणार असून दावा बळकट होणार आहे. माल्या यांना भारताच्या हवाली करायचं की नाही यासंबंधी 17 मे रोजी सुनावणी होणार असून सीबीआय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाची एक टीम उपस्थित असणार आहे. माल्या यांच्या विरोधातील आरोप सिद्ध करणारे पुरावे सादर झाल्यास मल्ल्याचं प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं. सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचलनालय सर्व कागदपत्रंही सादर करणार आहे.
एप्रिल 17 रोजी स्कॉटलंड यार्डने विजय माल्यांना अटक केली होती. मात्र काही वेळातच जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. ब्रिटनबाहेर प्रवास न करण्याच्या अटीखाली त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
फेब्रुवारी महिन्यात भारतीय परराष्ट्र मंत्रालयालाने ब्रिटन सरकारला मल्या यांना हद्दपार करुन भारताच्या स्वाधिन करावे असे पत्र पाठवले होते. मद्यसम्राट माल्या यांच्याविरुद्ध हवाला व्यवहाराचाही आरोप आहे. माल्या यांच्या किंगफिशर एअरलाइन्स या बंद पडलेल्या कंपनीने ९४00 कोटी रुपयांची बँकांची थकबाकी दिलेली नाही.
माल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल ९००० करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. २ मार्च 2016 रोजी विजय माल्या दुपारी १.३० वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय माल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय माल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.