उपराष्ट्रपतींच्या बंगल्यात माकडांनी मांडला उच्छाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:10 AM2018-07-25T00:10:07+5:302018-07-25T06:46:49+5:30
राजधानीतील माकडांच्या उपद्रवाचा विषय राष्ट्रीय लोकदलाचे सदस्य राम कुमार कश्यप यांनी राज्यसभेत उपस्थित केला.
नवी दिल्ली : भटक्या माकडांपासून होणारा उपद्रव राजधानी दिल्लीतील नागरिकांना नवा नाही. पण खुद्द उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या सरकारी निवासस्थानातही माकडांनी उच्छाद मांडल्याने त्याचे गांभीर्य वाढले असून यावर काही तरी उपाय करा, असे नायडू यांनी मंगळवारी सरकारला सांगितले.
राजधानीतील माकडांच्या उपद्रवाचा विषय राष्ट्रीय लोकदलाचे सदस्य राम कुमार कश्यप यांनी राज्यसभेत उपस्थित केला. लोकांच्या घरांच्या आवारातील झाडे माकडे उपटून टाकतात व दोरीवर वाळत घातलेले कपडेही पळवतात. माकडांमुळे संसद सदस्याला संसदीय समितीच्या बैठकीला वेळेवर जाता आले नाही, असे त्यांनी सांगितले.
सभापती नायडू यांनी कश्यप यांच्याशी सहमती दर्शविली आणि सांगितले की, माझ्या सरकारी निवासस्थानातही या माकडांनी उच्छाद मांडला आहे. एकूणच दिल्लीतील माकडांच्या उपद्रवावर काही तरी इलाज करावा लागेल, असे नायडू यांनी संसदीयकार्य राज्यमंत्री विजय गोयल यांना सांगितले. मात्र हे सांगत असताना, (प्राणीमित्र व केंद्रीय मंत्री)‘मनेका गांधी तर हे ऐकत नाहीत ना?’, असा मिश्किल शेराही मारला.