कोरोना संकटात नव्या आजाराची एंट्री; केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला; चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 15:06 IST2022-02-10T15:02:57+5:302022-02-10T15:06:24+5:30
कोरोनाचा धोका कायम असताना केरळमध्ये नव्या आजाराची एंट्री; प्रशासनाची चिंता वाढली

कोरोना संकटात नव्या आजाराची एंट्री; केरळमध्ये पहिला रुग्ण सापडला; चिंता वाढली
वायनाड: देशातील कोरोना संकट कायम आहे. डिसेंबर, जानेवारीत देशात कोरोनाची तिसरी लाट आली होती. आता ही लाट ओसरत चालली आहे. त्यातच केरळमध्ये एका नव्या आजाराचा रुग्ण आढळून आला आहे. वायनाड जिल्ह्यात मंकी फिवरचा रुग्ण सापडला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं याबद्दलची माहिती दिली.
वायनाडमधल्या थिरुन्नेली ग्राम पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या पनवेली आदिवासी वस्तीतल्या एका २४ वर्षीय व्यक्तीला क्यासनुर फॉरेस्ट डिजीजची लागण झाली आहे. स्थानिक भाषेत या आजाराला मंकी फीवर म्हटलं जातं. हंगामी आजारांबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांनी आधीच अलर्ट जारी केला होता आणि स्थानिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं होतं, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सकीना यांनी दिली.
मंकी फीवरची लागण झालेल्या तरुणाला मनंथवाडी आरोग्य महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. मंकी फीवरचा आणखी कोणताही रुग्ण आढळून आलेल्या नसल्याचं सकीना यांनी सांगितलं. केरळमध्ये यावर्षी आढळून आलेला मंकी फीवरचा हा पहिलाच रुग्ण आहे. हा व्हायरस फ्लॅविविरायडा प्रकारात मोडतो. माकडाच्या माध्यमातून हा आजार माणसांपर्यंत पोहोचतो.