देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला, मुलांसाठी ठरू शकतो घातक, 'या' ठिकाणी हाय अलर्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 07:17 PM2022-07-19T19:17:20+5:302022-07-19T19:42:22+5:30
monkeypox : केरळमधील पाच जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, कारण या पाच जिल्ह्यांतील लोक संक्रमित रुग्णासोबत प्रवास करत होते.
नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात मंकीपॉक्स व्हायरसची 7000 हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. हा व्हायरस 75 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. याला महामारी म्हणून घोषित करण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. केरळमध्ये मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळल्यानंतर भारतात या व्हायरसबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केरळमधील पाच जिल्ह्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, कारण या पाच जिल्ह्यांतील लोक संक्रमित रुग्णासोबत प्रवास करत होते.
विशेषत: मुलांना या व्हायसरपासून स्वतःचे संरक्षण करण्यास सांगितले आहे. असे का होते हे जाणून घेणे देखील खूप महत्वाचे आहे. दरम्यान, 1975 पर्यंत भारतात स्मॉल पॉक्स आणि चिकन पॉक्स आजार आढळून आले होते, पण त्यानंतर हळूहळू भारताने लसीकरण कार्यक्रमाद्वारे या आजारावर नियंत्रण मिळवले. 1975 च्या आसपास जन्मलेल्या बहुतेक लोकांना एकतर लसीकरण करण्यात आले होते किंवा ते एकदा या आजारापासून बरे झाले होते.
आयसीएमआरने नुकत्याच जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुलांना मंकीपॉक्सपासून अधिक काळजी घ्यावी लागेल. कारण त्यांना चेचक विरुद्ध लसीकरण केलेले नाही. मुलांना चेचक रोगाचा त्रास झाला नाही किंवा त्यांना लसीची गरज नव्हती. एम्सच्या मेडिसिन विभागाचे तज्ज्ञ डॉ. पीयूष रंजन यांच्या म्हणण्यानुसार, तरुण आणि मुलांना या आजारापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण त्यांच्यात लसीची प्रतिकारशक्ती किंवा रोगापासून बरे होण्याची प्रतिकारशक्ती नाही.
आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वेही जारी
आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सच्या नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. यानुसार लोकांनी फ्लूची लक्षणे आणि ताप असलेल्या रुग्णांच्या संपर्कात येणे टाळावे. मृत आणि इतर वन्य प्राण्यांपासूनही लांब राहावे, असे म्हटले आहे. देशात मंकीपॉक्सचा धोका वाढू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेषत: मुलांनी यापेक्षा अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मधुकर रेनबो हॉस्पिटलच्या डॉ. अनामिका यांच्या मते, लहान मुलांना झुनोटिक (zoonotic) आजार होण्याची शक्यता जास्त असते.
मंकीपॉक्स हा देखील एक झुनोटिक रोग आहे, जो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो आणि नंतर त्याचे संक्रमण मानवांमध्ये सुरू होते. मंकीपॉक्सचा व्हायरस लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, कारण मुलांना स्मॉल पॉक्सची लस दिली गेली नाही. मुलांना स्वच्छतेची काळजीही घेता येत नाही, त्यांना मंकीपॉक्सची लागण झाली असेल तर हा व्हायरस त्यांच्यात अनेक दिवस राहू शकतो. त्यामुळे जास्त ताप आणि लाल पुरळ अंगावर येऊ शकतात.