Monkeypox : संकटाची चाहूल! 12 देशांत मंकीपॉक्सचा प्रसार, WHO ने दिला गंभीर इशारा; भारताला कितपत धोका?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:37 PM2022-05-23T18:37:29+5:302022-05-23T18:51:56+5:30
Monkeypox : भारतात अद्यापही मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही पण केंद्र सरकारने यासंदर्भात नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.
नवी दिल्ली - कोरोनापाठोपाठ आता जगभरात आणखी एक नवीन आजार अत्यंत वेगाने पसरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स. आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सचे तब्बल 92 रुग्ण आढळून आले आहेत. हे सर्व रुग्ण ब्रिटन, युरोपियन देश, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह 12 देशांतील आहेत. भारतात अद्यापही मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही पण केंद्र सरकारने यासंदर्भात नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला अलर्ट राहण्यास सांगितलं आहे.
मंकीपॉक्सचा प्रसार न झालेल्या देशांमध्ये अधिक रुग्ण आढळून येऊ शकतात, असा धोक्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. शारीरिक संबंधांमुळे मंकीपॉक्स माणसांमध्ये पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डेव्हिड हेमॅन यांनी म्हटलं आहे. आफ्रिकन देशांमध्ये दरवर्षी हजारो लोकांना मंकीपॉक्सची लागण होते. आतापर्यंत 12 देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनानंतर मंकीपॉक्स महामारी कारण ठरणार का? तसेच याचा भारताला कितपत धोका आहे याबाबत जाणून घेऊया...
चेंबूर येथील जैन मल्टिस्पेशॅलिटी रुग्णालयाचे सल्लागार डॉक्टर आणि संसर्गरोगतज्ज्ञ डॉ. विक्रांत शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. हा आजार कांजण्यांसारखा आहे. मंकीपॉक्सची लागण झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर माणसांना त्या विषाणूची बाधा होते. त्यामुळेच हा विषाणू वेगानं पसरतो. विषाणूच्या फैलावाचा वेग 3.3 ते 30 टक्के इतका आहे. कांगोमध्ये या विषाणूच्या संक्रमणाचा दर 73 टक्के होता. मंकीपॉक्सच्या संपर्कात येताच लोकांमध्ये ताप, अंगदुखी, थकवा ही लक्षणं आढळून येतात. तसेच त्रास वाढल्यास चेहऱ्यावर, हातावर त्याचा संसर्ग झाल्याचं दिसून येतं.
एड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ईश्वर गिलाडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हायरस सामान्यत: प्राण्यांमध्ये पसरतो आणि त्यानंतर प्राण्यांच्या माध्यमातून माणसांमध्ये त्याचा प्रसार होतो. मंकीपॉक्स एचआयव्हीप्रमाणे जेनेटिक असल्याचं सांगितलं. मंकीपॉक्स प्राण्यांमधून माणसांपर्यंत पोहोचतो. मात्र तो महामारीचं रुप घेईल, याबद्दलची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही. या विषाणूला घाबरण्याची गरज नाही. मात्र यावर संशोधन गरजेचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोना पाठोपाठ आलेल्या या आजारांमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनीही मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली आहे. बायडेन यांनी रविवारी सांगितले की युरोप आणि अमेरिकेत मंकीपॉक्सच्या अलीकडील प्रकरणांबद्दल काळजी करण्याची गरज आहे. विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना बायडेन यांनी प्रथमच या आजारावर जाहीरपणे भाष्य केले. हा संसर्ग पसरला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असं देखील बाय़डेन यांनी म्हटलं आहे.