मर्कटलीला! माकडांनी सुतळी बॉम्बची बॅग फेकल्याने तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 10:33 AM2018-07-21T10:33:38+5:302018-07-21T10:40:01+5:30
उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील घटना
फतेहपूर - माकडा हाती काकडा, अशी म्हण आपण ऐकली असेलच. पण माकडाच्या हातात बॉम्बने भरलेली बॅग सापडली तर कल्पनाच केलेली बरी. असाच प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. उत्तरप्रदेशच्या फतेहपूर जिल्हामध्ये माकडांनी सुतळी बॉम्ब असलेली बॅग फेकल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असून उपचारासाठी तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी ही घटना घडली. गुलाब गुप्ता (60) आणि त्यांचा पाच वर्षाचा नातू सम्राट घराजवळ शाळेच्या बसची वाट पाहत असताना अचानक बॉम्ब फुटला. बॉम्ब पडल्याने परिसरात खूप मोठा आवाज झाला. यामध्ये या दोघांसोबतच रस्तावर असणारी आणखी एक व्यक्तीही गंभीर जखमी झाली. बॉम्बचा आवाज येताच घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांनाही याबाबत माहिती दिली.
माकडांनी कचरा पेटीतून सुतळी बॉम्ब असलेली एक बॅग उचलली असून ते त्याच्यासोबत घराच्या छतावर खेळत असताना अचानक ही बॅग खाली पडल्याने ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या माकडांना लवकरात लवकर पकडावं अशा सूचना या वन अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच घटनास्थळावरून फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी बॉम्बचे काही नमुने जमा केले असून त्याची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.