उंदरांनी ढोसली नऊ लाख लिटर दारू, बिहार पोलिसांचा अजब दावा
By admin | Published: May 4, 2017 11:04 PM2017-05-04T23:04:23+5:302017-05-04T23:10:36+5:30
गोदामात ठेवलेली धान्यांची पोती उंदरांनी अनेकदा फस्त केल्याचं आपण नेहमी ऐकतो. पण आता उंदरांनाही दारूचं व्यसन जडलंय असं वाटतं.
Next
>
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि, 4 - उंदरांच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. गोदामात ठेवलेली धान्यांची पोती उंदरांनी अनेकदा फस्त केल्याचं आपण नेहमी ऐकतो. पण आता उंदरांनाही दारूचं व्यसन जडलंय असं वाटतं. कारण दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये उंदरांनी 9 लाख लिटर दारू फस्त केल्याचे समोर आले आहे, हा आमचा दावा नाही तर हा अजब दावा आहे बिहार पोलिसांचा.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात संपूर्ण राज्यात दारूबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या पोलीस स्थानकातील गोदामांमधून गायब असल्याचं वृत्त बिहारच्या स्थानिक माध्यमांनी दिल्यानंतर उंदरांचा हा महाप्रताप उघडकीस आला आहे. जप्त करण्यात आलेली दारू नष्ट करण्यात आली तर उर्वरित दारू उंदरांनी फस्त केली असं स्पष्टीकरण येथील पोलिसांनी दिलं आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं अतिरिक्त पोलिस महासंचालक एस .के.सिंघल यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं. चौकशी पूर्ण झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.
यापुर्वी येथील दोन पोलिसांना जप्त केलेली दारू संपवण्यामध्ये हात असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून त्यांना 18 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.