हिमाचलमध्ये पुन्हा मान्सूनचा कहर! १० जिल्ह्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 08:50 AM2023-08-19T08:50:38+5:302023-08-19T08:51:03+5:30
राज्यात पावसाने अजूनही कहर केला असून राज्यातील ६०० रस्ते अजूनही बंद आहेत.
हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. २१ ते २३ ऑगस्टपर्यंत राज्यातील१० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
पाऊस सुट्टीवरून परतला; आजपासून कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
शिमला हवामानशास्त्र केंद्राने माहितीनुसार, हिमाचलमध्ये पुढील ४८ तास पाऊस सुरू राहील. मात्र ४८ तासांनंतर म्हणजेच २१ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार आहे. या दरम्यान २१ ऑगस्टपासून राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. हा २४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हवामान खात्याने सांगितले की, शिमला, मंडी, कुल्लू, बिलासपूर, सोलन, चंबा, सिरमौर, उना आणि कांगडा येथे मुसळधार पाऊस पडेल. राज्यातील किन्नौर आणि लाहौल स्पिती या दोन जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे.
या दरम्यान पावसामुळे पिण्याच्या पाण्याची व विजेची समस्या निर्माण होऊ शकते. यासोबतच कांगडा, चंबा, शिमला, कुल्लू, सिरमौर, सोलन, किन्नौर आणि लाहौल स्पीतीमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता आहे.
हिमाचलमध्ये पाऊस सुरूच आहे. काल रात्री कांगडामध्ये जोरदार पाऊस झाला. तसेच मंडी, सोलन येथेही पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंडईच्या पुढे पांडोहपर्यंत महामार्ग खुला करण्यात आला आहे. मात्र येथून कुल्लूपर्यंत महामार्ग बंद आहे. अजूनही राज्यातील ६०० हून अधिक रस्ते बंद आहेत.
२४ जून रोजी मान्सून हिमाचलमध्ये दाखल झाला. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे ३३० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये रस्ते अपघातांचाही समावेश आहे. तसेच राज्याचे सात हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. १४-१५ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे राज्यात अवघ्या तीन दिवसांत ७० जणांना जीव गमवावा लागला.