दुष्काळ की सुकाळ? मान्सूनची कासवगती, देश व्यापला; परंतु जोर कमीच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 09:10 AM2021-07-21T09:10:37+5:302021-07-21T09:22:01+5:30
साधारणत: जुलैच्या १ तारखेपर्यंत मोसमी पाऊस संपूर्ण देशाला व्यापून टाकतो. यंदा मात्र तसे काही झाले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
साधारणत: जुलैच्या १ तारखेपर्यंत मोसमी पाऊस संपूर्ण देशाला व्यापून टाकतो. यंदा मात्र तसे काही झाले नाही. पावसाने थोडी ओढ दिलीच. सध्या काही भागात पावसाची रिपरिप सुरू झाली असली तरी पाहिजे तसा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडेल अशी आशा असताना दुष्काळ आहे की सुकाळ अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
हवामान खात्याचा अंदाज
आतापर्यंत देशात पावसाचे प्रमाण सहा टक्के कमी आहे. मात्र, जुलैच्या मध्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यातही पावसाचे प्रमाण चांगले राहील.
मान्सून का रेंगाळला
जूनच्या सुरुवातीला मान्सूनचे धडाकेबाज आगमन झाले. त्यावरून जून महिन्यातच मान्सून संपूर्ण देश व्यापून टाकत सर्व विक्रम मोडीत काढेल, असा अनुमान होता. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाचे ढग अचानक गायब झाले. सलग तीन-चार आठवडे शुष्क गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले. मात्र, त्यातही जोर नव्हताच. अल-निनोच्या प्रभावामुळे तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर विरून गेल्याने असे झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.