मान्सून १ जूनला!

By Admin | Published: May 11, 2015 03:29 AM2015-05-11T03:29:39+5:302015-05-11T03:29:39+5:30

मान्सून वेळीच म्हणजे १ जूनला केरळला धडक देणार असल्याची खूशखबर आहे; मात्र पाऊस कमी राहणार असल्याने सरकारला आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील.

Monsoon on June 1! | मान्सून १ जूनला!

मान्सून १ जूनला!

googlenewsNext

केरळमध्ये येणार : मात्र प्रमाण कमी राहण्याचा अंदाज

नवी दिल्ली : मान्सून वेळीच म्हणजे १ जूनला केरळला धडक देणार असल्याची खूशखबर आहे; मात्र पाऊस कमी राहणार असल्याने सरकारला आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनांना गती द्यावी लागेल.
पावसाची टंचाई अपेक्षित असलेल्या ५८० जिल्ह्यांसाठी सरकारला आकस्मिक योजना तयार ठेवाव्या लागतील. दुसरीकडे कृषी मंत्रालयाने पीक विमासारख्या योजनांना लोकप्रिय बनविण्यासाठी पावले उचलण्याचा विचार चालविला. मान्सूनची सक्रियता सामान्य दिसत असून, फार तर २ ते ३ दिवसांचा फरक पडू शकतो. सध्यातरी मान्सून विलंबाने येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. एल निनो फॅक्टरमुळे पाऊस सामान्यापेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याचे हवामान विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले.
आकस्मिक योजनांसाठी सज्जता
पाऊस सामान्यापेक्षा कमी राहणार असल्याच्या शक्यतेमुळे कृषी मंत्रालयाने होणारा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी योजनांची सज्जता करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारांना ५८० जिल्ह्यांमध्ये आकस्मिक योजनांना वेग देण्याचा आदेश देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत स्थानिक गरजांनुसार योजना अद्ययावत केल्या जात आहेत, असे कृषी सचिव सिराज हुसेन यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

पीक विमा योजनांना बळकटी
>  शेतकऱ्यांमध्ये पीक विमा योजना लोकप्रिय बनविण्यावर भर दिला जात आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) सामान्यापेक्षा कमी पाऊस राहणार असल्याची घोषणा यापूर्वीच केली असून, १५ मे रोजी मान्सूनच्या प्रगतीबाबत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
> स्कायमेट ही खासगी कंपनीही याच काळात मान्सूनची माहिती जारी करेल. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) कृषीचा वाटा केवळ १५ टक्के असला ६० टक्के लोकसंख्येची उपजीविका खरीप पिकांवरच निर्भर असते. केवळ ४० टक्के लागवडीखालील जमिनीवर सिंचनसुविधा आहेत.

------------

१ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होईल. दोन ते तीन दिवसांचा फरक पडू शकतो. आम्ही सामान्य पावसाचे भाकीत वर्तवले आहे. दक्षिण किनारपट्टीवर मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १ जून हीच आहे.
- जतीन सिंग, स्कायमेटचे सीईओ
------------
भात पिकासाठी पाऊस वेळेवर हवा
> नैर्ऋत्य मान्सूनचे वेळेवर आगमन हे खरीप पिकांच्या विशेषत: भात रोपांच्या रोवणीसाठी आवश्यक असते. कमी पाऊस तांदळाचे उत्पादन घटविते.
> गेल्या वर्षी देशात १२ टक्के कमी पाऊस झाल्याने अन्नधान्य, कापूस आणि तेलबियांचे उत्पन्न १२ टक्क्यांनी घटले आहे.
२०१४मध्ये झालेला कमी पाऊस आणि या वर्षी मार्च- एप्रिलमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाने फटका दिल्याने शेतकऱ्यांच्या वाट्याला नैराश्य आले.
> त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही वाढल्या. २०१४-१५ या वर्षात देशात धान्य उत्पादन तीन टक्क्यांनी कमी होऊन २५.७० कोटी टन राहिले आहे.

Web Title: Monsoon on June 1!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.