मान्सून केरळमध्ये !

By Admin | Published: June 9, 2016 06:22 AM2016-06-09T06:22:30+5:302016-06-09T06:22:30+5:30

दुष्काळामुळे आभाळाकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या नैऋत्य मान्सूनने अखेर सात दिवसांच्या विलंबाने केरळला धडक दिली

Monsoon in Kerala! | मान्सून केरळमध्ये !

मान्सून केरळमध्ये !

googlenewsNext


तिरुवनंतपुरम : दुष्काळामुळे आभाळाकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या नैऋत्य मान्सूनने अखेर सात दिवसांच्या विलंबाने केरळला धडक दिली आहे. या राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे देशभरात पावसाळ्याची सुरुवात झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले आहे. पहिल्याच पावसाच्या तडाख्याने केरळमध्ये एकाला जीव गमावावा लागला.
केरळ आणि लक्षद्वीपमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाच्या तिरुवनंतपुरम प्रादेशिक केंद्राचे प्रमुख के. संतोष यांनी केली आहे. मंगळवारच्या रात्रीपासून केरळच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. नैऋत्य मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राच्या उर्वरित भागासह मालदीव,केरळ, तामिळनाडू, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या तसेच मध्यमभागाकडे आगेकूच चालविली असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. यापूर्वी आयएमडीने ९ जून ही मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली होती. प्रत्यक्षात ८ जून रोजी मान्सूनसंबंधी तीनही परिमाणांची पूर्तता झाली. त्यामुळे त्याच दिवशी म्हणजे बुधवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा अधिकृतरीत्या करण्यात आली. (वृत्तसंस्था)
>सोमवारी राज्यामध्ये...
सध्याची अनुकूल परिस्थिती पाहता मान्सून येत्या ४ ते ५ दिवसात महाराष्ट्रात धडकेल, अशी आनंदाची बातमी पुणे वेधशाळेच्या संचालक सुनीतादेवी यांनी दिली.
केरळनंतर आता पुढील ४८ तासांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, केरळ व तामिळनाडूचा उर्वरित भाग आणि दक्षिण आंध्रप्रदेशात सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती आहे़
त्यानंतर दोन-तीन दिवसांत तो राज्यभरात बरसू लागेल, असे सध्याचे चित्र आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूर येथे ९, रत्नागिरी ८, पणजी २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ साताऱ्यातही दमदार सरी कोसळल्या असून महाबळेश्वर चिंब भिजून गेले.

Web Title: Monsoon in Kerala!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.