ओम बिर्लांची नाराजी दूर; सर्वपक्षीय खासदारांनी काढली समजूत, अध्यक्षस्थानी बसण्यास तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 02:09 PM2023-08-03T14:09:20+5:302023-08-03T14:11:03+5:30
Parliament Monsoon Session: दोन दिवसांच्या नाराजीनंतर ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षांच्या आसनावर बसण्यास तयार झाले. जाणून घ्या प्रकरण...
Om Birla News: खासदारांच्या गदारोळामुळे नाराज झालेले लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला दोन दिवसानंतर आज गुरुवारी (3 ऑगस्ट) दुपारी 2 वाजेपासून सभागृहाचे कामकाज हाती घेतील. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांची भेट घेऊन सभागृहाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली. सर्व खासदारांनी सभागृहाचा मान ठेवण्याचे आश्वासन दिले. यानंतर लोकसभा अध्यक्षांची नाराजी दूर झाली.
मंगळवार(1 ऑगस्ट) रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभेत खासदारांनी प्रचंड गदारोळ घातला होता. यावेली काही खासदारांनी अध्यक्षांच्या खुर्चीजवळ येऊन पत्रके भिरकावली. यामुळे ओम बिर्ला नाराज झाले. सभागृहातील खासदारांना शिस्त लागेपर्यंत अध्यक्षांच्या खुर्चीवर बसणार नसल्याचे जाहीर केले. यानंतर खासदारांनी त्यांची समजूत काढली.
1 ऑगस्टच्या घटनेने लोकसभा अध्यक्ष दुखावले
विरोधक वारंवार गदारोळ करीत असल्यामुळे व लोकसभेच्या कामकाजात अडथळा येत असल्यामुळे आपण दुखावलो आहोत. जोपर्यंत खासदारांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नाही आणि ते संसदेच्या प्रतिष्ठेचे पालन करीत नाहीत, तोपर्यंत आपण लोकसभेत जाणार नाहीत, असे ओम बिर्ला यांनी जाहीर केले. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी ओम बिर्ला यांची नाराजी योग्य ठरवत सरकारमधील मंत्र्यांना त्यांची नाराजी दूर करण्याचे निर्देश दिले.
का उचलले पाऊल?
मंगळवारी दिल्ली सेवा संबंधी विधेयकाला विरोध करताना विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे कागद फेकले व वेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. ओम बिर्ला यांनी वारंवार इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. असे वागणे योग्य नाही. यावर चर्चा करण्यासाठी योग्य संधी देणार आहे, असेही बिर्ला सांगत होते. परंतु, विरोधी खासदार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे व अध्यक्षांच्या खुर्चीकडे कागद फेकल्यामुळे दुखावलेल्या ओम बिर्ला यांनी हे पाऊल उचलले आहे.