भाजप खासदारांच्या 'अशा' वागण्यामुळे पंतप्रधान मोदी नाराज; मागवली नावांची यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 02:46 PM2021-08-10T14:46:07+5:302021-08-10T14:48:12+5:30
या विधेयकात सीमाशुल्क कायदा, व्यापार चिन्ह कायदा यांसह अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. विरोधकांनी विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला आणि नंतर त्यावर मत मागितले. पण सभागृहाने हा प्रस्ताव 44 विरुद्ध 79 मतांनी फेटाळून लावला. सध्या राज्यसभेत भाजपचे एकूण 94 सदस्य आहेत. (Monsoon Session Of Parliament)
नवी दिल्ली - न्यायाधिकरण सुधारणा विधेयक 2021 सोमवारी राज्यसभेत मंजूर झाले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे बहुतांश खासदार अनुपस्थित होते. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली आहे. ( Monsoon Session Of Parliament PM Modi angry with bjp mps for absence in rajya sabha)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत यावर नाराजी व्यक्त केली. तसेच विधेयक मंजूर होत असताना सभागृहात जे खासदार उपस्थित नव्हते त्यांची यादी मागवली आहे. राज्यसभेत सोमवारी संक्षिप्त चर्चेनंतर विरोधकांच्या गदारोळातच 'न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, 2021' मंजूर करण्यात आले.
या विधेयकात सीमाशुल्क कायदा, व्यापार चिन्ह कायदा यांसह अनेक कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. विरोधकांनी विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव दिला आणि नंतर त्यावर मत मागितले. पण सभागृहाने हा प्रस्ताव 44 विरुद्ध 79 मतांनी फेटाळून लावला. सध्या राज्यसभेत भाजपचे एकूण 94 सदस्य आहेत.
भाजपकडून खासदारांना व्हिप जारी -
पावसाळी अधिवेशनाचा बराचसा कालावधी गोंधळात गेला आहे. विरोधकांची घोषणाबाजी आणि त्यानंतर तहकूब होणारं कामकाज यामुळे बहुतांश विधेयक चर्चा न करताच मंजूर झाली. यानंतर आता काही महत्त्वाची विधेयकं राज्यसभेत पारित करून घ्यायची असल्यानं सरकारनं तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच भाजपच्या राज्यसभेतील खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. लोकसभेतील सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठीदेखील भाजपनं व्हिप बजावला आहे. त्यामुळे आजचा आणि उद्याचा दिवस महत्त्वाचा असेल.