यंदा मान्सून वेळेतच ! समाधानकारक पावसाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:35 AM2021-05-07T06:35:11+5:302021-05-07T06:35:26+5:30
१ जूनपर्यंत केरळमध्ये होणार दाखल, हवामान खात्याचा अंदाज
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात एक चांगली बातमी आहे. भारतात मान्सूनचे आगमन वेळेवर १ जून रोजी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हा पहिला अंदाज असल्याचे भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी स्पष्ट केले आहे.
देशभरात सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. याच कालावधीत मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात येतो. हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार केरळमध्ये मान्सून १ जूनपर्यंत धडकणार आहे. महाराष्ट्रातही मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याकडून १५ मे रोजी अधिकृत अंदाज जाहीर करण्यात येणार असून, पर्जन्यमानाचा अंदाज ३१ मे रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राजीवन यांनी दिली. मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज असल्याने आता शेतीच्या कामांनाही वेग मिळेल.
यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज
यावर्षी देशात सरासरीच्या ९८ टक्के अर्थात समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने यापूर्वीच वर्तविला आहे. सलग दोन वर्षांपासून देशात समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीही हाच अंदाज आहे.
अल निनोचा प्रभाव नाही
ला निना आणि अल निनोचा प्रभाव नसल्यामुळे भारतीय उपखंडात चांगला पाऊस पडेल, असेही यापूर्वी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजात सांगण्यात आले होते. सरासरीच्या ९० ते ९६ टक्के प्रमाण सामान्यपेक्षा कमी, सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के प्रमाण सामान्य आणि १०४ ते ११० टक्के पाऊस पडल्यास ते प्रमाण सामान्यहून अधिक मानले जाते. तर ११० टक्क्यांपेक्षा जास्त पर्जन्यमान असल्यास अतिवृष्टी मानली जाते.